For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयपीएल’चा अंतिम सामना बेंगळूरऐवजी अहमदाबादमध्ये

06:29 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
आयपीएल’चा अंतिम सामना बेंगळूरऐवजी अहमदाबादमध्ये
oplus_1024
Advertisement

वृत्तसंस्था 

Advertisement

नवी दिल्ली : अहमदाबाद सलग दुसऱ्या हंगामात 31 मे रोजी ‘आयपीएल’च्या अंतिम सामन्याचे यजमानपद भूषवणार आहे. मूळ नियोजनानुसार हे यजमानपद बेंगळूरकडे होते, मात्र, आता त्यात बदल करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी ही घोषणा केली असून ’क्वालिफायर 1’ सामना धर्मशाला येथे, तर प्ले-ऑफचे अन्य दोन सामने न्यू चंदिगड येथे खेळवले जातील असेही स्पष्ट केले आहे.

परंपरेनुसार, ‘आयपीएल’च्या अंतिम सामन्याचे यजमानपद बेंगळूरकडे असणे अपेक्षित होते, कारण ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर’ हा संघ गतविजेता आहे. गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्याशिवाय अहमदाबादने यापूर्वी 2022 आणि 2023 मध्येही ‘आयपीएल’च्या अंतिम सामन्यांचे यजमानपद भूषवले आहे. ‘अंतिम सामन्याचे यजमानपद मूलत: बेंगळूरकडेच सोपवण्यात आले होते. तथापि, स्थानिक संघटना आणि प्रशासनाकडून काही अशा मागण्या करण्यात आल्या, ज्या ‘बीसीसीआय’ची प्रस्थापित मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमावलीच्या कक्षेबाहेर होत्या. याच कारणामुळे सामन्याचे ठिकाण बदलून ते दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आला आहे, असे मंडळाने नमूद केले आहे. मात्र, कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळूरमध्ये नेमक्या कोणत्या मागण्या करण्यात आल्या होत्या याचा तपशील मंडळाने दिलेला नाही.

Advertisement

मंडळाने असेही स्पष्ट केले आहे की, या वर्षी काही प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय बाबींचा विचार करून, प्ले-ऑफ फेरीसाठी वापरल्या जाणाऱ्या मैदानांची संख्या विशेष बाब म्हणून तीनपर्यंत वाढवण्यात आली आहे. ‘गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये ’क्वालिफायर 1’ सामना 26 मे रोजी धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात जिंकणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल, असे ‘बीसीसीआय’ने म्हटले आहे.

त्यानंतर, सामन्यांचे केंद्र न्यू चंदिगड येथील नवीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम राहील. या स्टेडियमवर 27 मे रोजी गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांमध्ये ‘एलिमिनेटर’ सामना खेळवला जाईल. याच मैदानावर 29 मे रोजी ‘क्वालिफायर 2’ सामनाही खेळवला जाईल, अशी माहिती मंडळाने दिली आहे. धर्मशाला येथे ‘आयपीएल’चा प्ले-ऑफ सामना खेळवला जाण्याची ही पहिलीच वेळ असेल. ‘क्वालिफायर 2’ सामन्यात ‘क्वालिफायर 1’मधील पराभूत संघ आणि ‘एलिमिनेटर’ सामन्यातील विजयी संघ यांच्यात लढत होईल. यातून अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ निश्चित केला जाईल.

मोफत ‘आयपीएल’ तिकिटांचा कोटा नडला ?

या हंगामाचा समारोप 31 मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या भव्य अंतिम सामन्याने होईल. असे मंडळाने म्हटले आहे. ‘बीसीसीआय’मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादची निवड करण्यामागे त्या स्टेडियमची प्रचंड आसनक्षमता हे मुख्य कारण आहे. यामुळे सामन्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहतील. बेंगळूरमधील स्टेडियमची क्षमता तुलनेने कमी असल्याने राज्यातील आमदार, विधान परिषद सदस्य आणि खासदार यांना प्रत्येकी तीन मोफत ‘आयपीएल’ तिकिटांचा कोटा देण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाशी मंडळ सहमत नाही, अशी माहिती मिळाली आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सुमारे 35,000 प्रेक्षक बसू शकतात.

Advertisement
Tags :

.