आयपीएल : अहमदाबादमध्ये अंतिम लढत
आरसीबी-सनरायझर्स लढत आता लखनौमध्ये, मुल्लनपूरमध्ये प्लेऑफ लढती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
क्वालिफायर 2 लढतीसह अहमदाबादमध्ये या वर्षीच्या आयपीएलची अंतिम लढत 3 जून रोजी होणार आहे तर मुल्लनपूरमध्ये पहिल्या दोन प्लेऑफ लढती याच महिन्यात खेळविल्या जातील, असे बीसीसीआयने मंगळवारी जाहीर केले.
पावसाची शक्यता विचारात घेऊन बीसीसीआयने 23 मे रोजी आरसीबी व सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बेंगळूरमध्ये होणारा सामना आता लखनौमध्ये खेळविण्यात येईल. याआधीचा बेंगळूरमध्ये झालेला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हैदराबाद व कोलकाता येथे आधीच्या वेळापत्रकानुसार प्लेऑफ लढती होणार होत्या. पण भारत-पाक संघर्षामुळे आयपीएल स्पर्धा एक आठवडा तहकूब करण्यात आल्यामुळे या वेळापत्रकात बदल करावा लागला आहे.
सामन्यांची ठिकाणे ठरविताना बीसीसीआयने पावसाची शक्यता विचारात घेऊन निर्णय घेतला आहे. ‘प्लेऑफच्या नव्या ठिकाणांची निवड करताना आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने हवामान व अन्य गोष्टींचा विचार करून निर्णय घेतला आहे,’ असे बीसीसीआयने निवेदनात म्हटले आहे. क्वालिफायर 1 व एलिमिनेटर लढती मुल्लनपूर येथे 29 व 30 मे रोजी तर अहमदाबादमध्ये क्वालिफायर 2 व अंतिम लढत अनुक्रमे 1 व 3 जून रोजी खेळविल्या जातील. अहमदाबादमध्ये यापूर्वीही 2022 व 2023 मध्ये आयपीएलच्या अंतिम लढती खेळविण्यात आल्या होत्या.