आयपीएल सट्टेबाजीचा पर्दाफाश, 34 जणांना अटक
पणजी, कळंगुट, नागवेतून आवळल्या मुसक्या : 50 लाखांहून अधिक किमतीचे मोबाईल जप्त
पणजी : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर गोव्यातून सट्टा लावण्याचे प्रकार बेफामपणे सुरू होते. या घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलिस आणि गुन्हे अन्वेषण शाखेच्या (क्राईम ब्रँच) विभागाने स्वतंत्रपणे मोहीम राबवित आयपीएल सट्टेबाजी प्रकरणाचा पर्दाफाश केला. या प्रकरणात गुंतलेल्या सुमारे 34 संशयितांना पोलिसांनी पणजी, कळंगुट, नागवे, वेर्णा परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून 50 लाखांहून अधिक किंमतीचे मोबाईल फोन्स, लॅपटॉप आणि जुगारासाठी वापरलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. उत्तर गोव्याचे अधीक्षक अक्षत कौशल आणि उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कळंगुटचे निरीक्षक यांच्या नेतृत्त्वाखाली उपनिरीक्षक साहिल वायंगणकर आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा पर्दाफाश केला.
8 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान, कळंगुट पोलिसांनी ’सन अँड सॅन्ड’ अपार्टमेंट (सिकेरी) येथील एका फ्लॅटवर छापा टाकला. या छाप्यात दातला फनींद्र वर्मा (वय 37) आणि वेजंदला साई बाबू (वय 36) या दोघांना आयपीएल सामन्यावर ऑनलाईन सट्टा खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून 10 मोबाईल फोन्स, 1 लॅपटॉप आणि अन्य अॅक्सेसरीज असे मिळून अंदाजे 95,000 हजार ऊपयांचे साहित्य जप्त केले आहे. ऑनलाइन सट्टेबाजीवर मोठ्या छाप्यात, गोवा गुन्हे शाखेने काल बुधवारी 32 आरोपींना अटक केली आणि गुन्हे करण्यासाठी वापरले जाणारे 40 लाख ऊपयांहून अधिक किमतीचे साहित्य जप्त केले. सासष्टीमधील नागोआ आणि तिसवाडीतील कुडका येथे चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर आयपीएल जुगार रॅकेटवर हा छापा टाकण्यात आला. दोन्ही प्रकरणांमध्ये संगणक, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर गेमिंग वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
या दोन्ही प्रकरणांमध्ये सुमारे 40 लाख ऊपयांची फसवणूक झाली. पहिल्या प्रकरणात, 18 मोबाईल फोन, 5 लॅपटॉप, 3 भारतीय पासपोर्ट, 11 बँक पासबुक, 54 सिम कार्ड, 8 चेक बुक आणि वेगवेगळ्या बँकांचे 363 एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. दुसऱ्या प्रकरणात 84 पासबुक, 27 चेक बुक, 83 मोबाईल फोन, 6 लॅपटॉप, 12 डेस्कटॉप, 6 सीपीयू, 3 राउटर आणि 109 एटीएम कार्ड वेगवेगळ्या बँकांचे जप्त करण्यात आले. दरम्यान, गोवा पोलिसांनी या हंगामात आयपीएलच्या कामगिरीत सुधारणा करण्याच्या हेतूने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आयपीएल सट्टाबाजीचे आतापर्यंत एकूण 6 गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत एकूण 44 जणांना अटक करण्यात आली असून, आतापर्यंत अंदाजे 45 लाख ऊपयांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.