गोव्यात होणार यंदाचा आयपीएल लिलाव; डिसेंबरमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार
पणजी : यंदाच्या आयपीएल लिलावाचे आयोजन गोव्यात करण्यात येणार असल्याची माहिती आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी दिली आहे. डिसेंबरच्या मध्यात हा लिलाव होण्याची शक्यता असून, 15 ते 16 डिसेंबर या तारखा प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील तीन वर्षांत आयपीएलचे लिलाव भारताबाहेर दुबई, जेद्दाह आणि अबू धाबी येथे झाले होते. यंदा मात्र लिलाव पुन्हा भारतात आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी गोव्याची निवड करण्यात आली आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनीही आयपीएल 2027 च्या हंगामासाठीचा लिलाव यंदा डिसेंबरमध्ये गोव्यात होणार असल्याचे स्पष्ट केले. हा मिनी लिलाव असल्याने त्याचे आयोजन एका दिवसात होण्याची शक्यता आहे.
गोव्यात आयपीएल लिलावाचे आयोजन होणार असल्याने राज्याच्या क्रीडा आणि पर्यटन क्षेत्राला याचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.