टाटाकडून होणार आयफोनची निर्मिती
तामिळनाडूत होसूरजवळ कारखाना : 50 हजार जणांना रोजगार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठे उद्योजक रतन टाटा यांच्या मालकीच्या टाटा समूहाकडून लवकरच भारतामध्ये आयफोनची निर्मिती केली जाणार आहे. टाटाने आयफोन निर्मितीसाठी तामिळनाडूमध्ये होसूरजवळ आपला कारखाना उभारण्याचे निश्चित केले आहे.
आयफोनचा सर्वात मोठा प्रकल्प
सदरच्या आयफोन निर्मिती कारखान्यामुळे जवळपास 50 हजार जणांना रोजगार प्राप्त होणार असल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे. दक्षिण आशिया देशांमध्ये आयफोनचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अॅपलची इतर उत्पादने बनवण्यासाठी टाटा गुंतवणुकीची तयारी करत आहे. या अंतर्गतच तामिळनाडूतील होसूरजवळ आयफोनचा सर्वात मोठा निर्मिती प्रकल्प होणार आहे. या आयफोन निर्मितीच्या कारखान्यांमध्ये 20 हूनअधिक घटक निर्मितीसाठी असणार असून 50 हजार जणांना या ठिकाणी रोजगार प्राप्त होणार आहे.
कधी होणार सुरु
पुढील बारा ते अठरा महिन्यांमध्ये हा कारखाना नियमित स्वरूपात सुरू करण्याची योजना कंपनीने आखली आहे. या नव्या कारखान्यामुळे देशातील आयफोनच्या मागणीचा पुरवठा करणे पुढील काळात सहज शक्य होणार आहे. यासोबतच टाटाचे अॅपलसोबत संबंधही अधिक मजबूत होणार आहेत. टाटाचा आयफोन निर्मितीचा एक कारखाना कर्नाटकात आधीपासूनच कार्यरत आहे. तामिळनाडूतील होसूरमधील टाटाच्या या कारखान्याच्या उत्पादनाची क्षमता कर्नाटकातील कारखान्याच्या उत्पादन क्षमतेला मागू मागे टाकू शकते, असेही म्हटले जात आहे.
आयफोन होणार स्वस्त
एकदा स्थानिक स्तरावर अॅपलचे आयफोन उपलब्ध होऊ लागले की नजीकच्या काळामध्ये यांच्या किमतीदेखील कमी केल्या जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे आगामी काळामध्ये अॅपल आणि सॅमसंग या दोन कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा वाढू शकते.