रशियन ऑलिम्पिक समितीवरील निलंबन आयओसीकडून मागे
वृत्तसंस्था, लॉसेन (स्वित्झर्लंड)
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) कार्यकारी मंडळाने रशियन ऑलिम्पिक समितीवरील (आरओसी) निलंबन तात्पुरते मागे घेतले आहे. हे निलंबन 12 ऑक्टोबर 2023 पासून लागू करण्यात आले होते.
आयओसीच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार आयओसीच्या कायदेशीर व्यवहार आयोगाने केलेल्या सखोल विश्लेषणानंतर हा निर्णय घेण्यात आला. या विश्लेषणात असे दिसून आले की, युक्रेनच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (एनओसी) अधिकारी क्षेत्रात येणाऱ्या प्रदेशांमधील कोणत्याही प्रादेशिक क्रीडा संघटनांचा आता रशियन ऑलिम्पिक समितीच्या सदस्यत्वामध्ये समावेश नाही. या व्यतिरिक्त, रशियन ऑलिम्पिक समितीने अशी खात्री दिली आहे की, ते या प्रदेशांमध्ये कोणतीही क्रियाकलाप करत नाहीत आणि भविष्यातही करणार नाही. आयओसीचे कार्यकारी मंडळ (इबी) त्या प्रदेशांमधील रशियन ऑलिम्पिक समितीच्या सर्व हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे सुरूच ठेवेल आणि आवश्यकता भासल्यास पुढील उपाययोजना करण्याचा अधिकार राखून ठेवेल.
‘एलए28’ ऑलिम्पिक गेम्स आणि ‘डोलोमिटी व्हॅल्टेलीना 2028’ हिवाळी युवा ऑलिम्पिक गेम्ससाठी पात्रता कालावधी सुरू झाला आहे आणि सर्व खेळाडूंना या स्पर्धांमध्ये समान संधी मिळणे आवश्यक आहे. हे लक्षात घेवून आयओसीच्या कार्यकारी मंडळाने एक निर्णय घेतला आहे. त्यानुसार रशियन खेळाडू आणि संघाच्या संदर्भात (संरक्षणात्मक उपाययोजनांसह) आंतरराष्ट्रीय महासंघ आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजकांसाठी 28 फेब्रुवारी 2022 आणि 28 मार्च 2023 रोजी शिफारस केलेल्या सहभागाच्या अटी आता लागू होणार नाहीत.