गदग येथील चोरी प्रकरणात बैलहोंगलच्या चोरट्याचा सहभाग
42 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज जप्त
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
गदग जिल्ह्यात चोरी केल्याच्या आरोपावरून बैलहोंगल, जि. बेळगाव येथील एका युवकासह तिघा जणांना अटक करून गदग पोलिसांनी त्यांच्याजवळून तब्बल 42 लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
गदगचे जिल्हा पोलीसप्रमुख रोहन जगदीश, पोलीस उपअधीक्षक मुर्तुजा खादरी यांच्या मार्गदर्शनाखाली गदग शहरचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, बेटगेरीचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व महिला पोलीस ठाण्याचे निरीक्षक एल. के. जुलकट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
अटक करण्यात आलेल्या तिघा जणांमध्ये एकजण बैलहोंगलचा राहणारा आहे. महम्मदरफिक इस्माईल (वय 36) राहणार बी. सी. रोड, बंटवाळ, दक्षिण कन्नड जिल्हा, इम्रान खुतबुद्दीन तिगडी (वय 40) राहणार बैलहोंगल, जि. बेळगाव, मौलाअली अल्लीसाब दर्गा (वय 34) राहणार गाजीपूर, ता. हानगल, जि. हावेरी अशी त्यांची नावे आहेत.
मोहम्मदरफिक हा भाजीविक्री करतो. तर इम्रान भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करतो. मौलाअली हा व्यवसायाने वाहनचालक आहे. या तिघा जणांकडून 33 लाख 33 हजार रुपये किमतीचे 330 ग्रॅम सोन्याचे दागिने, 90 हजार रुपये किमतीचे 750 ग्रॅम चांदीचे दागिने, चोरीसाठी वापरलेली 8 लाख रुपये किमतीची कार व चोरीच्या पैशातून खरेदी केलेली मारुती सुझुकी अल्टो कार असा एकूण 42 लाख 73 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
6 ते 8 मे 2026 या अवधीत उदयनगर-गदग येथे या त्रिकुटाने एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून 34 लाख 20 हजार रुपये किमतीचे 342 ग्रॅम सोन्याचे दागिने, 2 लाख 2 हजार रुपये किमतीचे 1 किलो 970 ग्रॅम चांदी व 8 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम असा मोठा ऐवज पळविला होता. यासंबंधी मंजुनाथ शण्मुखसा बसवा यांनी गदग शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. या प्रकरणाचे धागेदोरे बेळगावपर्यंत पोहोचल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी बैलहोंगल येथील युवकासह तिघा जणांना अटक करून ऐवज जप्त केला आहे.