For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीत ३१ रोजी निमंत्रितांचे विभागीय कवयित्री संमेलन

04:23 PM Jan 29, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीत ३१ रोजी निमंत्रितांचे विभागीय कवयित्री संमेलन
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

चिंतामणी साहित्य सहयोग प्रकाशन संस्था व सिंधुदुर्गातील नामवंत कवी आरती प्रभू यांच्या स्मरणार्थ गेली ४३ वर्षे नियमितपणे सुरू असलेल्या आरती मासिकाच्या आयोजनाखाली, कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी व श्रीराम वाचन मंदिर यांच्या सहकार्याने १९ वे निमंत्रितांचे विभागीय कवयित्री संमेलन शनिवार, ३१ जानेवारी रोजी आर. पी. डी. हायस्कूल, सावंतवाडीच्या सभागृहात सायं. ४.३० वा. संपन्न होणार आहे. संमेलन आयोजनासाठी 'आरती'च्या कार्यकारी संपादक ज्येष्ठ साहित्यिक उषा परब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत श्रीया भागवत, मेघना राऊळ, श्वेतल परब, प्रज्ञा मातोंडकर, प्रतिभा चव्हाण, स्मिता परब,ऋतुजा सावंत भोसले यांचा समावेश आहे.

संमेलनासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील प्रथितयश कवयित्री तसेच सिंधुदुर्ग व सावंतवाडीतील निवडक कवयित्रींना आमंत्रित केले आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी वसई येथील डॉ. पल्लवी बनसोडे या शब्दवेल प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. डॉ. बनसोडे या लेखिका, कवयित्री, गीतकार व संपादिका आहेत. त्यांच्या 'निःशब्द' कथासंग्रहाचा तीन भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. 'इवल्याशा जाणिवेने' व 'देहमूठ' हे काव्यसंग्रह आहेत. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील आठ प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या अभंगरचना व गीते संगीतबद्ध असून सुरेश वाडकर व लॉरिसा आल्मेडा यांसारख्या नामवंत गायकांनी गायली आहेत. 'अधोरेखित' या दिवाळी अंकाच्या संपादिका आहेत.संमेलनाचे उद्घाटन गोव्यातील कवयित्री, पत्रकार, नाट्यकर्मी, मुलाखतकार, स्तंभलेखक कालिका बापट यांच्या हस्ते होणार आहे. त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. त्या उत्तम मुलाखतकार असून त्यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, प्रशांत दामले, सोनाली कुलकर्णी वगैरे नामवंतांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांचे 'मनमोही', 'मनमधुरा' , 'रे मना', 'उत्सव थेंबांचा' हे काव्यसंग्रह व ललितसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Advertisement

याबरोबरच निमंत्रितांमध्ये डॉ. चित्रा गोस्वामी(रत्नागिरी), डॉ. लता ऐवळे कदम (सांगली), पुजा दिवाण (कोल्हापूर), श्रृती हजारे ( गोवा), सरिता पवार- कणकवली, डॉ. सई लळीत- ओरोस, मिनाक्षी अळवणी- बांदा, मनिषा पाटील- कणकवली, ॲड. अंजली मुतालिक- कुडाळ, आर्या बागवे- मालवण व सावंतवाडी तील प्रा. शालिनी मोहळ, मंगल नाईक जोशी, मृण्मयी पोकळे, तन्वी परब, आदिती मसुरकर, सारिका पाटील
या प्रथितयश कवयित्रींचा समावेश आहे.


विशेष सन्मान, बक्षीस वितरण

या संमेलनात सावंतवाडीतील ज्येष्ठ नागरिक महिला संघ सदस्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग गोवा मर्यादित नवोदित काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण केले जाणार आहे.दरवर्षीप्रमाणे हे १९ वे संमेलन असंख्य काव्यप्रेमींच्या उपस्थितीत संपन्न होण्यासाठी काव्यरसिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा, संपादक प्रभाकर भागवत, सहसंपादक भरत गावडे, विठ्ठल कदम, संस्थेचे सर्व पदाधिकारी, कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष दीपक पटेकर व श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.