सरस्वती वाचनालय शतकोत्तर सुवर्णमहोत्सवासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रण
डॉ. किरण ठाकुर यांनी घेतली भेट
बेळगाव : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी भेट घेतली. यावेळी बेळगावच्या शहापूर भागातील सरस्वती वाचनालयाचे हे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष असून यानिमित्ताने आपण वाचनालयाच्या कार्यक्रमाला यावे, असे निमंत्रण डॉ. किरण ठाकुर यांनी नितीन गडकरी यांना दिले. या भेटीत डॉ. किरण ठाकुर म्हणाले, सदर वाचनालयाने अवघ्या चार पुस्तकांच्या पुंजीवर हे वाचनालय सुरू केले. दीडशे वर्षांपासून हे वाचनालय कार्यरत आहे. सध्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळ विविध उपक्रम राबवत आहे.
अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला प्रयोग सरस्वती वाचनालयाच्या आवारातच झाला होता. याचे औचित्य साधून वाचनालय पुन्हा हे नाटक सादर करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी माहितीही डॉ. किरण ठाकुर यांनी दिली. आपण बेळगावला येण्यास नेहमीच उत्सुक आहोत. लवकरच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण बेळगावला येणार असून सरस्वती वाचनालयाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहीन, अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली.
राष्ट्रीय महामार्गाचे काम जलदगतीने करा
दरम्यान, याच भेटीत डॉ. किरण ठाकुर यांनी सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. परंतु, ते जलदगतीने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच बेळगाव ते मोपा (गोवा) व्हाया चंदगड विमानतळासाठी चौपदरी मार्ग निर्माण करावा, अशी मागणी केली. यामुळे प्रवाशांची सोय होईलच. परंतु, शेतकऱ्यांना आपल्या उत्पादन मालाची निर्यात करणेही सोपे होईल, असे सांगितले. या सर्व मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले.