For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रीय पुस्तक महोत्सवाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

10:03 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रीय पुस्तक महोत्सवाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
Advertisement

पणजी : गोव्यात उद्यापासून सुरु होणाऱ्या राष्ट्रीय पुस्तक महोत्सवाला सरकारतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. त्याचबरोबर अनेक सरकारी संस्थांना ग्रंथ महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा, असे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले. नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे संचालक युवराज मलिक, या महोत्सवाचे गोव्याचे मुख्य प्रवर्तक किरण ठाकुर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांना या महोत्सवाचे उद्घाटन करण्याचे रितसर निमंत्रण दिले. मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्वीकारले आणि उद्या 4 रोजी सायं. 4.30 वा. उद्घाटन समारंभास येण्याचे आश्वासन दिले.

Advertisement

या महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे चेअरमन तसेच दै. ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांना दिलेले सहकार्य आणि योगदानाबाबत मुख्यमंत्र्यांनी किरण ठाकुर यांचे कौतुक केले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी गोव्यातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना देखील ग्रंथ प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. गोवा सरकारतर्फे शिक्षण खाते आणि उच्च शिक्षण संचालनालयाने देखील सर्व विद्यार्थ्यांना संमेलनात सहभागी होण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे.

नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे संचालक युवराज मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना आतापर्यंत घेण्यात आलेल्या ग्रंथ महोत्सवाची माहिती दिली आणि गोव्यातील ग्रंथ महोत्सवात किमान दोन लाख नागरिक सहभागी होतील असे सांगितले आणि सरकारतर्फे सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.  मुख्यमंत्र्यांनी ग्रंथ महोत्सव यशस्वी करण्यासाठी आवश्यक ते पूर्ण सहकार्य सरकारतर्फे दिले जाईल, असे आश्वासन दिले आणि अशा पद्धतीचे ग्रंथ महोत्सव गोव्यात दरवर्षी आयोजित करावे अशी मौलिक सूचना देखील केली. मुख्यमंत्र्यांना भेटावयास गेलेल्या शिष्टमंडळात लोकमान्य मल्टिपर्पज संस्थेचे प्रीतम बिजलानी तसेच कमांडर गौरव साही आणि सागर जावडेकर हे उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.