गुंतवणूकदारांनी 64 हजार कोटी रुपये काढले
मुंबई :
रुपयाचे अवमूल्यन, अमेरिकेतील बाँड यील्डमध्ये वृद्धी तसेच कमकुवत तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर जानेवारीत शेअरबाजारातून विदेशी गुंतवणूकदारांकडून पैसे काढणे सुरुच होते. जानेवारीत आतापर्यंत विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी 64 हजार कोटी रुपये काढले आहेत. याआधी डिसेंबर महिन्यात शेअरबाजारात विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी 15,446 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार जानेवारीत 24 तारखेपर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी 64,156 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले आहेत. मॉर्निंगस्टार इन्वेस्टमेंट अॅडव्हायजर्स इंडियाचे संचालक हिंमाशु श्रीवास्तव यांच्या मते, भारतीय रुपया हा डॉलरच्या तुलनेत खूप अस्थिर आहे. सातत्याने रुपयाची घसरण सुरु राहिल्याने विदेशी गुंतवणूकदारांमध्ये दबाव पहायला मिळतो आहे. या दबावातच गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढून घेत आहेत. कंपन्यांचे तिमाही निकालही चांगले लागले नसल्याने त्याचे नकारात्मक परिणाम गुंतवणूकदारांवर जाणवले, असेही ते म्हणाले.