गुंतवणूकदारांनी गमावले 5 लाख कोटी
शेअरबाजार 1 हजार अंकांनी गडगडला : अमेरिकेतील व्याजदरवाढीचा परिणाम
वृत्तसंस्था / मुंबई
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेने आपल्या व्याजदरात 0.75 टक्के इतकी वाढ केल्याने त्याचा परिणाम भारतीय शेअरबाजारावर दिसला. दिवसभरात बीएसई निर्देशांक 1 हजार अंकांनी गडगडल्याचे दिसून आले. याचदरम्यान गुरुवारी एकाच दिवशी गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी रुपये बुडाले असले तरी एकंदर यावर्षी लिस्टेड कंपन्यांच्या बाजार भांडवलात तब्बल 27 लाख कोटी रुपयांची मोठी कपात झाल्याचे दिसून आले आहे.
गुरुवारी अमेरिकेतील फेडरल बँकेने व्याजदरवाढीची घोषणा करताच भारतीय बाजार बिथरुन घसरण नोंदवत बंद झाला. सेन्सेक्स 1,045 अंकांनी घसरत 51,495.79 अंकांवर तर निफ्टी 331 अंकांच्या घसरणीसह 15,360.60 अंकांवर बंद झाला. गुरुवारी गुंतवणूकदारांनी 5 लाख कोटी गमावले आहेत. 1 जानेवारीपासून आतापर्यंत सेन्सेक्स व निफ्टीत अनुक्रमे 11.5 टक्के, 11 टक्के इतकी विक्रमी घसरण दिसली आहे. यावर्षी सेन्सेक्स 6 हजार 654 अंकांनी खाली आला आहे. महागाई तसेच विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीवर दिलेला भर याचाही नकारात्मक परिणाम बाजारावर दिसला.