एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक वाढ सुरुच
मेमध्ये 26688 कोटीची गुंतवणूक : असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस् इन इंडियाची माहिती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी किंवा सिप अंतर्गत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढलेली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस इन इंडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यामध्ये एसआयपीच्या माध्यमातून 26688 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून ही सर्वकालिक उच्चांकी असल्याची माहिती आहे. इतर महिन्यांच्या तुलनेमध्ये पाहता मे मध्ये झालेली गुंतवणूक ही आजवरची सर्वाधिक गुंतवणूक मानली जात आहे. या आधीच्या म्हणजे एप्रिल महिन्यात सिपच्या माध्यमातून 26 हजार 632 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. सोबतच सिप किंवा एसआयपी खात्यांची संख्या वाढून 8.56 कोटींवर पोहोचली आहे. हाही एक प्रकारचा नवा विक्रम मानला जात आहे.
इक्विटीत घटली गुंतवणूक
इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये मे महिन्यात 22 टक्के इतकी घसरण पाहायला मिळाली आहे. मागच्या महिन्यामध्ये 21.66 टक्के घसरणीसह इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये 19013 कोटी रुपये गुंतवले गेले आहेत. या आधीच्या एप्रिल महिन्यामध्ये पाहता 24269 कोटी रुपये इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केले गेले होते. सलग पाचव्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक घसरणीत राहिली असल्याचे पाहायला मिळाले. ऑगस्ट 2023 पासून पाहता एसआयपीच्या माध्यमातून दर महिन्याला सरासरी 20 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवले जात आहेत.
गुंतवणूकीचे पुढील चित्र
महिन्याच्या सुरुवातीला जागतिक स्तरावर युद्धासारखी स्थिती असल्याकारणाने गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक योजनेमध्ये बदल केला पण आजही एसआयपीच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक ही लोकप्रिय राहिली आहे. लार्ज पॅप आणि फ्लेक्सी कॅप या फंडामध्ये गुंतवणुकीबाबत ग्राहकांचा कल वाढू शकतो. या दोन्ही गटांमध्ये गुंतवणूक काहीशी कमी झालेली आहे. दीर्घकालीन गुंतवणूक करण्याबाबत गुंतवणूकदारांना जास्त रस वाटतोय.