पाच लाख कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्रात पाच लाख कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. हा प्राथमिक आकडा आहे तो वाढूही शकतो. असे आकडे म्हणजे कितीवर किती शुन्ये असा पहिला प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडतो तर यामुळे माझ्या जीवनात काय फरक पडणार असा सर्वांनाच प्रश्न असतो. एकीकडे असे डोळे दीपवून टाकणारे आकडे आणि दुसरीकडे मोफत धान्य, लाडक्या बहिणी, मोफत प्रवास, मोफत औषधोपचार यासाठीच्या रांगाच्या रांगा हे चित्र खरे की ते असा सर्वानाच प्रश्न पडतो.दावोस येथे जागतिक आर्थिक फोरम परिषद सुरु आहे. या परिषदेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिष्टमंडळ पोहोचले आहे. परिषदेच्या पहिल्याच दिवशी विविध उद्योगातील गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास पसंती दिली आहे. महाराष्ट्रातील शेवटचे टोक असलेल्या गडचिरोली जिह्यात कल्याणी समुहाने 5200 कोटी गुंतवणूकीचा करार करुन सुरवात केली आहे.नक्षलवाद प्रभावीत गडचिरोलीत पोलाद निर्मिती प्रकल्प उभारणी कल्याणी उद्योग समुह करणार आहे. गडचिरोली जिह्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आणि गेले काही महिने ते नक्षलवाद, नक्षलवादाचे स्वरुप आणि देशापुढची, राज्यासमोरची आव्हाने यावर बोलत होते. आता फडणवीस या प्रश्नाला भिडलेले दिसतात आणि प्रेम, सहकार्य, विश्वास आणि विकास या मार्गाने ते नक्षलवाद मोडून अप्रगत इलाखे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पाऊले टाकताना दिसत आहेत. त्यांच्या व सरकारच्या धोरणांचे एकीकडे स्वागत केले पाहिजे. पण हा दूरचा प्रवास आहे तोवर त्यात अडथळे किती येतात, आणले जातात, राजकारण किती होते असे अनेक प्रश्न आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली प्रमाणेच सांगली जिह्यातील दुष्काळी, अविकसित जतचे पालकत्व घेतले आहे. जतला आता पाणी आले आहे. प्रचंड क्षेत्रफळ असलेली औद्योगिक वसाहत साकारती आहे आणि तेथेही मोठ्या गुंतवणूकीचा अनेक हाताना काम देणारा उद्योग अपेक्षित आहे. दावोस परिषदेतच त्यावर शिक्कामोर्तब झाले तर उत्तम. कोकण, मराठवाडा, सोलापूर, कोल्हापूर यासह उद्योग व्यवसाय विखरुन विखरुन झाले पाहिजेत आणि त्यासाठी सर्वांची सहमती व सहकार्य असले पाहिजे अन्यथा असा एखादा उद्योग येणार असे दिसले की काही लांडगे आरडाओरड करु लागतात, लचके तोडू लागतात. खटले, उपोषणे, आंदोलने यांना उत येतो आणि उद्योजक तेथून पळ काढतो. आपण असे अनेकवेळा अनुभवले आहे. यासाठी सरकारचा निर्धार, लोकांची इच्छाशक्ती आणि टाईमबॉंड कार्यक्रम गरजेचा असतो. अलीकडे दळणवळण सोयी झाल्या आहेत, विमानतळ विकास प्रस्थापित आहे. याचाही उद्योग व्यवसाय विस्तारासाठी फायदा शक्य आहे. नव्या आर्थिक सुधारणा नंतर महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद येथेच उद्योगधंद्यांची प्रचंड वाढ झाली आणि शहरीकरण व शहरीकरणाचे प्रश्न तीव्र झाले आहेत. विकेंद्रित विकास आणि शेती व ग्रामविकास याकडे दुर्लक्ष झाले. त्याचा फटका शहरी व ग्रामीण दोन्हीकडे बसला आहे. या पार्श्वभूमीवर विकेंद्रित विकास, पर्यावरण रक्षण आणि जनजीवन आनंददायी करणारी पावले पडणं गरजेचे होते. फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यात आणि शासनाच्या धोरणात तशी शुभ चिन्हे दिसत आहेत. गडचिरोली जिह्यात कल्याणीप्रमाणेच जेएसडब्ल्यू समूह तीन लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. स्टील प्रकल्पासोबत पायाभूत सुविधा, ऊर्जा, लेथियम असे अन्य प्रकल्प तेथे त्यांनी प्रस्तावित केले आहेत. रत्नागिरी जिह्यात संरक्षण क्षेत्रात मोठा प्रकल्प होतो आहे. ही गुंतवणूक वेळेत झाली तर महाराष्ट्राचा पर्यायाने देशाचा विकास आणि अर्थव्यवस्था गतिमान होईल आणि जगातली पाचव्या स्थानावरची अर्थव्यवस्था म्हणून आम्ही प्रगती साधू. एकीकडे दावोसला हे सुरु असताना अमेरिकेत ट्रम्प युग अवतरले आहे आणि शपथ घेताच त्यांनी जे उलट सुलट निर्णय, घोषणा, आदेश सुरु केले आहेत. त्यामुळे अवघे विश्व चिंतेत पडले आहे. ट्रम्प हे आयात होणाऱ्या मालावर प्रचंड कर बसवणार आहेत, जागतिक आरोग्य संघटना सोडणार आहेत आणि पॅरिस परिषदेत जागतिक पर्यावरण व कार्बन उत्सर्जन या संदर्भात झालेले ठराव धुडकवणार आहेत. एकूणच जगातील ही एक महासत्ता आगामी काळात कशी वागेल का वागेल कुणाकुणाला त्याचा फटका बसेल याचा काही अंदाजच येईना झाला आहे. त्यामुळे आर्थिक क्षेत्रात मोठी चलबिचल आहे, शेअरबाजार कोसळत आहेत. पर्यावरणवादी चिंतेत आहेत आणि ट्रम्प यांनी भूमीपुत्राबाबत केलेली विधाने, ऊर्जा, संरक्षण, शांतता या संदर्भात मांडलेली मते अमेरिका व जग यांच्यात दरी निर्माण होईल असे वाटावे इतकी भयंकर आहेत. चीन, रशिया आणि अमेरिका या तीन शक्तीत अमेरिका उदारमतवादी म्हणून ओळखली जायची, तेथे नागरिकांना मोकळीक वाटावी असे वातावरण होते. जगभरातील विद्यार्थी तेथे, शिक्षण, संशोधन, उद्योग, नोकरीसाठी रमलेले आहेत. ट्रम्प त्यांना दुखावणार अशी चिन्हे आहेत. ओघोनेच रशिया, चीन या प्रमाणेच अमेरिकाही स्वातंत्र्य चिमटून ठेवणारा देश म्हणून पुढे आला तर आश्चर्य वाटायला नको. जगात एकीकडे आर्थिक सुधारणा गतिमान होत आहेत, संपर्क साधने वेगवान झाली आहेत. एआय तंत्रज्ञान विकसित झाले आहे. रोबो, मशिन आणि वेग असह्य वाढतो आहे. आजचे ज्ञान व कौशल्य उद्या मागे पडते आहे. अशा वेळी अर्थव्यवस्था वाढत असल्या तरी बेरोजगारी वाढत आहे. पदवीधर वाढत असले तरी कौशल्य व कालसंगत ज्ञान असलेले युवा कमी होत आहेत. शेतीतील रोजगार संपत चालला आहे. सरकार मोफत धान्य आणि रेवड्या वाटून लोकांना आळशी बनवत आहे आणि जागतिक पातळीवरही वातावरण फारसे चांगले नाही. रशिया-युक्रेन संघर्ष संपलेला नाही अशी अनेक आव्हाने देशासमोर जगासमोर असताना महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणुकीचे स्वागत केले पाहिजे. त्याच जोडीला आपण जागतिक वेगावर आणि ज्ञान विज्ञान आणि कौशल्य शाखांवर कसे स्वार होणार यांचाही रोडमॅप करायला हवा अन्यथा गुंतवणूक येईल पण लोकांचे दु:ख, दैन्य संपणार नाही. विकासाच्या दिशा लक्षात घेत गुंतवणुकीसोबत अव्वल मॅनपॉवर उभारणीसाठी कठोर पावले उचलली पाहिजेत.