राज्यात 10.27 लाख कोटींच्या गुंतवणुकीचा ओघ
बेंगळूरमधील इन्व्हेस्ट कर्नाटक-2025ची फलश्रुती : 6 लाख रोजगारनिर्मिती शक्य
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरमध्ये तीन दिवस चाललेल्या ‘इन्व्हेस्ट कर्नाटक-2025’ या जागतिक भांडवल गुंतवणूकदार परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या परिषदेतून राज्यात 10,27,378 लाख कोटी रुपये भांडवल गुंतवणुकीचा ओघ आला आहे. यातून 6 लाख रोजगारनिर्मिती होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली आहे.
राजवाडा मैदानावर आयोजित गुंतवणूक परिषदेत शुक्रवारी उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. इन्व्हेस्ट कर्नाटकच्या माध्यमातून 10 लाख कोटी रु. गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. 4.30 लाख कोटी रुपये गुंतवणुकीला अंतिम स्वरुप देण्यात आले आहे. तर 6.23 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी पुढे आलेल्या उद्योजकांना आमचे सरकार आवश्यक सर्व प्रकारे सहकार्य करणार आहे, असे ते म्हणाले.
2000 साली आम्ही कर्नाटकातील पहिली गुंतवणूक परिषद विधानसौध सभागृहात घेतली होती. त्याचे उद्घाटन इन्फोसिसचे नारायणमूर्ती यांनी केले होते. त्यानंतर ही परिषद आम्ही सलग 2-3 वर्षे आयोजित केली होती. आतापर्यंत घेतलेल्या काही परिषदा यशस्वी झाल्या, तर काही अयशस्वी झाल्या. यंदाच्या गुंतवणूक परिषदेत 5 हजारहून अधिक उद्योजकांनी सहभाग घेतला आहे. येथील वातावरण, सिंगल विंडो सुविधा, पुरेसे मनुष्यबळ, आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा इतर राज्यांमध्ये नसल्याची जाणीव उद्योजकांना झाली आहे, असे ते म्हणाले.
बेंगळूरबाहेर गुंतवणुकीसाठी 75 टक्के उद्योजकांची तयारी
बेंगळूरमधील लोकसंख्येचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने आमच्या सरकारने नूतन औद्योगिक धोरण तयार केले आहे. बेंगळूरची लोकसंख्या 1.40 कोटीपर्यंत वाढली आहे. वाहनांची संख्या 1.10 कोटी आहे. यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने उद्योगमंत्री एम. बी. पाटील आणि त्यांच्या पथकाने मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करून बेंगळूरबाहेर उद्योग स्थापनेसाठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न चालविले आहेत. इतर राज्यांपेक्षा आमच्या राज्यात जमिनीला अधिक मागणी आहे. त्यामुळे बेंगळूरबाहेर उद्योग सुरु करण्यासाठी 75 टक्के उद्योजक आणि तंत्रज्ञांनी सहमती दर्शविली आहे, असेही शिवकुमार यांनी सांगितले.
45 टक्के गुंतवणूक उत्तर कर्नाटकात
मंत्री एम. बी. पाटील म्हणाले, काही प्रतिष्ठित कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात रस दाखविला असून करार प्रक्रिया सुरु आहे. आता गुंतवणूक करार केलेल्या 75 टक्के कंपन्यांनी बेंगळूरबाहेर म्हणजेच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये गुंतवणुकीची तयारी दर्शविली आहे. यामुळे 45 टक्के भांडवल उत्तर कर्नाटक भागात जाईल. नवे औद्योगिक धोरण 2025-30 अंतर्गत राज्यात 20 लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
नव्या औद्योगिक धोरणांतर्गत...
नव्या औद्योगिक धोरणांतर्गत विजापूरमध्ये इंटस्ट्रीयल पार्क, हुबळीत स्टार्टअप पार्क आणि इतर शहरांत डीप-टेक पार्क, स्विफ्ट सिटी अस्तित्वात येतील. डीप-टेक पार्क व स्विफ्ट सिटी प्रकल्पांतर्गत प्रत्येकी 1 लाख कोटी रुपये गुंतवणूक आकर्षित तसेच 1 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य केले जाईल. क्विन सिटी योजनेसंबंधी 10 विद्यापीठांशी करार करण्यात आला आहे, अशी माहिती अवजड आणि मध्यम उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी दिली
गुंतवणूक करणाऱ्या प्रमुख कंपन्या...
जिंदाल समूह ऊर्जा, सिमेंट, स्टील व इतर उद्योगांमध्ये 1.2 लाख कोटी रु.
बल्डोटा ग्रुप कोप्पळमध्ये स्टील उत्पादन युनिटसाठी 54,000 कोटी रु.
लॅम रिसर्च कंपनी उत्पादन व संशोधनात 10,000 कोटी रु.
स्नायडर कंपनी इलेक्ट्रिक उत्पादन निर्मितीत 2,247 कोटी रु.
व्होल्वो कंपनी इलेक्ट्रिक बस/ट्रक निर्मितीत 1,400 कोटी रु.
होंडा कंपनी विद्युतचलित वाहननिर्मितीत 600 कोटी रु.
सॅफ्रॉन कंपनी एव्हियोनिक्स उत्पादनात 225 कोटी रु.