मार्च महिन्यात म्युच्युअल फंडामध्ये घटली गुंतवणूक
इक्विटीत 25082 कोटीची गुंतवणूक : एसआयपी गुंतवणूकीत अल्पशी घट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू असून यादरम्यान मार्च महिन्यामध्ये म्युच्युअल फंडात निव्वळ गुंतवणुकीत घसरण पाहायला मिळाली आहे. इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये मार्च महिन्यात 25 हजार 82 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. हीच गुंतवणूक फेब्रुवारीमध्ये पाहता 29303 कोटी रुपये झाली होती.
म्हणजेच फेब्रुवारीच्या तुलनेमध्ये मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक 14 टक्के कमी दिसून आली आहे. मार्च महिन्यात पाहता म्युच्युअल फंडातून जवळपास 1.64 लाख कोटी रुपये काढण्यात आले आहेत. फेब्रुवारीमध्ये या प्रकारामध्ये 40 हजार 76 कोटी रुपये गुंतवण्यात आले होते तर डेट म्युच्युअल फंडामध्ये पाहता मार्च महिन्यात 2.02 लाख कोटी रुपये काढण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात पाहता या प्रकारात 6525 कोटी रुपये गुंतवण्यात आले होते.
एसआयपी गुंतवणुकीत दिसली घट
दुसरीकडे एसआयपीच्या माध्यमातून होणाऱ्या गुंतवणुकीमध्ये सुद्धा हलकीशी घसरण पाहायला मिळाली. मार्च 2025 मध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडामध्ये 25 हजार 926 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये हीच गुंतवणूक 25999 कोटी रुपये इतकी होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सध्याला व्यापार शुल्क आकारणीवर भर दिला असून त्याचे कमी अधिक पडसाद सर्वच देशातील शेअर बाजारांवर दिसून येत आहेत. असे जरी असले तरी एसआयपीच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक तशी पाहता स्थिरच राहिली आहे. जानेवारी महिन्यात एसआयपी च्या माध्यमातून 26400 कोटी रुपये आले होते. डिसेंबरमध्ये हाच आकडा 26459 कोटी रुपये होता. काही झालं तरी एसआयपीच्या माध्यमातून 25 हजार कोटीपेक्षा अधिक रुपये महिन्याला सातत्याने बाजारामध्ये गुंतवले जात आहेत, ही बाब तशी पाहता समाधानकारक मानली पाहिजे. गुंतवणूकदार अधिक परिपक्व झाले आहेत हे यातून स्पष्ट होते आहे. बऱ्याच गुंतवणूकदारांनी लॉन्ग टर्म प्रकारांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले आहे.
विविध प्रकारातील गुंतवणूक
विविध प्रकारातील गुंतवणुकीचा विचार करता फ्लेक्सी कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये मार्चमध्ये सर्वाधिक गुंतवणूक झालेली पाहायला मिळाली आहे. मार्चमध्ये सर्व 11 इक्विटी म्युच्युअल फंड कॅटेगरीत गुंतवणूक झालेली दिसून आली. यामध्ये फ्लेक्सी कॅप फंडमध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली जी 5615 कोटी रुपयांची आहे. हीच गुंतवणूक फेब्रुवारीत या प्रकारामध्ये 5104 कोटी रुपये इतकी होती. गुंतवणूक वाढण्यामध्ये दुसऱ्या नंबरवर स्मॉल कॅप फंडचा वाटा राहिला असून मार्चमध्ये 4092 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. फेब्रुवारीत हीच गुंतवणूक 3722 कोटी रुपये होती.
इतर प्रकारांची कामगिरी
मिडकॅप फंडामध्ये मार्चमध्ये 3,438 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून फेब्रुवारी महिन्यात 3406 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. तर सेक्टोरल आणि थिमॅटिक फंडामध्ये गुंतवणूक मात्र मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मार्च महिन्यात ही गुंतवणूक केवळ 170 कोटी रुपये होती तर याच्या आधीच्या म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये 5718 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. म्हणजे मासिक आधारावर पाहता गुंतवणूक 97 टक्के घसरलेली दिसून आली. मार्चमध्ये डिव्हीडंड यील्ड फंड्सला सर्वात कमी प्रतिसाद मिळाला. यामध्ये निव्वळ 140 कोटी रुपये गुंतवले गेले. लार्ज कॅप फंडांचा विचार करता गुंतवणूक 13 टक्के कमी होत मार्चमध्ये 2479 कोटी रुपये झाली. फेब्रुवारी महिन्यात 2866 कोटी रुपये यामध्ये गुंतवले गेले होते.