गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक दहाव्या महिन्यातही वाढतीच
1979 कोटी रुपयांची गुंतवणूक : म्युच्युअल फंड असोसिएशनची माहिती
वृत्तसंस्था/मुंबई
भारतात फेब्रुवारी महिन्यातदेखील सलग दहाव्या महिन्यात गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक वाढलेली दिसून आली आहे. फेब्रुवारी महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये एकंदर 1979 कोटी रुपये गुंतवण्यात आले आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. सध्याला शेअरबाजारात समभागांमध्ये सातत्याने घसरण होत असताना त्याचप्रमाणे जागतिक अनिश्चितेच्या पार्श्वभूमीवर भारतात गोल्ड ईटीएफमध्ये फेब्रुवारीत चांगली गुंतवणूक झालेली दिसून आली. या प्रकारात गुंतवणूकदारांनी मागच्या महिन्यात 1979.84 कोटी रुपये गुंतवले आहेत. सलग दहाव्या महिन्यामध्ये गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक वाढीव पहायला मिळाली. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस इन इंडिया यांनी ही माहिती दिली आहे.
जानेवारीत विक्रमी गुंतवणूक
देशातील एकूण 19गोल्ड ईटीएफ फंडांमध्ये वरीलप्रमाणे निव्वळ गुंतवणूक केली गेली आहे. मागच्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेमध्ये गुंतवणूक 98 टक्के अधिक दिसून आली आहे. मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 17 गोल्ड ईटीएफ फंडांमध्ये 997.22 कोटी रुपये गुंतवले गेले आहेत. यावर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेमध्ये फेब्रुवारी 2025 मधील गुंतवणूक 47 टक्के कमी दिसून आली आहे. जानेवारी महिन्यात विक्रमी 3751.42 कोटी रुपये गोल्ड ईटीएफमध्ये घातले गेले होते.
गुंतवणूकीवर परिणाम नाही
शेअर बाजारात घसरण होत असली तरी गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढीच्या दिशेनेच सरकताना दिसते आहे. सोन्याच्या किंमतीदेखील वाढलेल्या असून याचाही परिणाम गोल्ड ईटीएफवर नकारात्मक दिसून आलेला नाही.