For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुंतवणुकीचा सल्ला; 85 लाखांवर डल्ला!

11:02 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुंतवणुकीचा सल्ला  85 लाखांवर डल्ला
Advertisement

बेळगावमधील डॉक्टर तर गोकाक येथील उद्योजकाला सायबर गुन्हेगारांचा दणका : युनायटेड किंगडममधून फसवणुकीचे रॅकेट

Advertisement

बेळगाव : चोऱ्या, घरफोड्यांप्रमाणेच सायबर गुन्हेगारांच्या कारवायाही थांबता थांबेनात. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून सायबर गुन्हेगार सावजाला गंडविण्याचे प्रकार सुरूच आहेत. आता शेअरमार्केटिंगमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत बेळगाव व गोकाकमधील दोघा जणांना 85 लाख रुपयांहून अधिक रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकाराने एकच खळबळ माजली आहे. सायबर क्राईम विभागाकडून सातत्याने जनजागृती केली जाते. सायबर गुन्हेगारांकडून सर्वसामान्य नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी कोणत्या सुरक्षा, उपाययोजना कराव्यात, आपला मोबाईल, लॅपटॉप व इतर गॅझेट्स वापरताना कशा पद्धतीने खबरदारी घ्यावी? आदींविषयी सतत माहिती दिली जाते. तरीही फसवणुकीचे प्रकार काही कमी होईनात. एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे, तुम्हाला कोटीची लॉटरी लागली आहे, किमती भेटवस्तू पाठवणार आहे, जुनी वाहने, जुने फर्निचर विकायचे आहे, असे सांगत सावजांच्या बँक खात्यातील रक्कम हडप करण्याचे प्रकार आता जुने झाले आहेत. आधार क्रमांकाच्या माध्यमातूनही बँक खात्यातील रक्कम हडप करण्याचे प्रकार आता जुने झाले. सायबर गुन्हेगार आता ट्रेडिंगच्या माध्यमातून फसवणूक करू लागले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजवर केवळ झारखंड, राजस्थान, नोयडा, हैदराबाद, मुंबई, बेंगळूरमध्ये बसून हे गुन्हेगार सावजांना ठकवत होते. आता फसवणुकीसाठी परदेशातूनही फोन कॉल सुरू झाले असून ट्रेडिंगच्या नावाखाली धनिकांना ठकविण्यात येत आहे. बेळगाव येथील एका डॉक्टराला 58 लाख 62 हजार रुपयांना ठकविण्यात आले आहे. यासंबंधी शहर सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ऑक्टोबर 2023 ते 6 जानेवारी 2024 पर्यंत डॉक्टरला मोठ्या प्रमाणात गंडविण्यात आले आहे. +44 पासून सुरुवात होणाऱ्या क्रमांकावरून बेळगाव येथील एका डॉक्टरच्या मोबाईलवर मेसेज आला. ‘ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा, जादा नफा मिळवा’ असा तो मेसेज होता. युनायटेड किंगडममधून आलेला तो मेसेज होता. मेसेज पाठोपाठ लगेच एक व्हिडिओ कॉल आला. पलीकडे एक तरुणी बोलत होती. ‘फायदा तुमचाच आहे, गुंतवणूक करा’ असा सल्ला त्या तरुणीने डॉक्टरांना दिला. या संभाषणानंतर अकौंट आदी ट्रेडिंगसाठी लागणारी इतर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. प्रत्यक्षात गुंतवणुकीलाही सुरुवात झाली. सुरुवातीला डॉक्टरांनी आपल्या खात्यातून काही रक्कम काढूनही बघितली. त्यांना खात्री पटल्यानंतर गुंतवणूक वाढवली. सायबर गुन्हेगारांनी पाठविलेल्या ट्रेडिंग लिंकवरून व्यवहार सुरू झाला. 58 लाख 62 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर आपण फसलो गेलो, हे संबंधित डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच शहर सीईएन पोलीस स्थानकात धाव घेतली. यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संजीव कांबळे पुढील तपास करीत आहेत. अशीच एक घटना गोकाकमध्येही घडली आहे. जिल्हा सीईएन पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर पुढील तपास करीत आहेत. गोकाकमधील एका उद्योजकाला 27 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा आणि अधिकाधिक नफा मिळवा, असे आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी उद्योजकाची फसवणूक केली आहे.

Advertisement

पंधरा दिवसात 27 लाख गुंतवणूक

15 जानेवारी 2024 पासून केवळ पंधरा दिवसात 27 लाख रुपयांहून अधिक रक्कम गुंतवून घेऊन सायबर गुन्हेगारांनी नंतर गोकाक येथील त्या उद्योजकाशी संपर्कच बंद केला आहे. त्यांच्या व्हॉट्सअॅपवरही एक मेसेज आला. ‘ट्रेडिंगमधील गुंतवणूक फायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही सांगतो त्याप्रमाणे गुंतवणूक करत जा. अल्पावधीत मोठ्या प्रमाणात नफा मिळवा’ असे सांगण्यात आले. सुरुवातीला उद्योजकाची खात्री पटण्यासाठी भरघोस परतावाही देण्यात आला. रक्कम वाढताच सायबर गुन्हेगारांनी संपर्क बंद केला आहे. या दोन्ही प्रकरणांमुळे सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा उघडकीस आला आहे.

सायबर गुन्हेगारांचे फसवणुकीचे नवनवे प्रकार उघडकीस

बेळगाव येथील एक डॉक्टर व गोकाकमधील एका उद्योजकाला ट्रेडिंगच्या नावाखाली 85 लाख रुपयांहून अधिक गंडा घातल्यानंतर सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा नवा प्रकार उघडकीस आला आहे. शहर व जिल्हा सायबर क्राईम विभागाने ही दोन्ही प्रकरणे गांभीर्याने घेऊन गुन्हेगारांच्या बँक खात्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, आपली फसवणूक व्हायची नसेल तर नागरिकांनी सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडू नये. आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात गंडविण्यात येते. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी बाळगणे, हीच उपाययोजना आहे, असे पोलीस अधिकारी सांगतात. जिल्हा सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर, शहर सीईएनचे पोलीस निरीक्षक संजीव कांबळे या दोन्ही प्रकरणांचा तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.