हलशी गोळीबार प्रकरणाच्या तपासाला गती
तिघांना अटक-सुटका : बंदूक हस्तगत
खानापूर : तालुक्यातील हलशी येथे शिकार करताना झालेल्या गोळीबारात हलशी येथील अल्ताफहुसेन महमदगौस मकानदार हा ठार झाला होता. याबाबत नंदगड पोलीस स्थानकात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हलशी गोळीबारातील प्रकरणातील तीन आरोपींना नंदगड पोलिसांनी अटक केली होती. यात उस्मान माहबुबसाब ताहसीलदार, मत्तुम माहाबुबसाब ताहसीलदार, मलीक खतालसाब शाईवाले या तीन आरोपींना अटक करून मंगळवारी रात्री उशिरा न्यायालयासमोर हजर केले होते. परंतु आरोपींच्या वतीने येथील अॅड. सादिक नंदगडी यांनी न्यायालयासमोर नंदगड पोलिसांनी तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आणून दिल्याने न्यायालयाने या तीन आरोपींना तात्पुरते सोडून देण्यात आले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली नंदगड पोलीस कसून तपास करत आहेत. शिकारीसाठी वापरण्यात आलेली बंदूक घटनास्थळाजवळील विहिरीत सापडली असून नंदगड पोलीस कसून तपास करत आहेत. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबतही तपास सुरू आहे.
हलशी येथील युवक अल्ताफहुसेन महमदगौस मकानदार याचा सोमवारी पहाटे 3 वाजता शिकारीसाठी गेला असता बंदूक गोळीबारात जखमी होऊन मृत्यू झाला होता. नंदगड पोलिसांनी अल्ताफहुसेन मकानदार याच्याबरोबर शिकारीला गेलेल्या सहा जणांवर गुन्हा नोंद केला असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. मात्र नंदगड पोलिसांना अद्याप ठोस पुरावे आणि माहिती मिळू शकली नाही. गुन्हा दाखल केलेल्याकडून चौकशी दरम्यान वेगवेगळी आणि विसंगत माहिती देत असल्याने पोलिसानांही तपासात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पोलीसही अल्ताफहुसेन याचा खून केला गेला की, चुकून गोळी लागून मृत्यू झाला असावा, या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाहीत. शिकारीसाठी वापरण्यात आलेल्या बंदुकीतून गोळीबार होऊन अल्ताफहुसेन याचा मृत्यू झाला होता. ही बंदूक जवळच्या विहिरीत टाकण्यात आली होती. पोलिसांनी विहिरीत शोध घेतला. त्यावेळी विहिरीत बंदूक, चाकूसह इतर छोटी हत्यारे सापडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.