पूजाच्या ‘दिमतीला’ दोघे अधिकारी
मोबाईलमध्ये सापडले दोन अधिकाऱ्यांचे नंबर : चौकशीनंतर दोघांवरही होणार कडक कारवाई,मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
पणजी : सरकारी नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडवणाऱ्या पूजा नाईकने दोन सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनकांना लाखो रुपयांना गंडवल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. तपासकामादरम्यान पूजाचे फोन कॉल्स तपासले असता या दोन्ही अधिकाऱ्यांचे क्रमांक मिळालेले आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल. ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पूजा हिच्या नावावर महागड्या मोटारीसह चार फ्लॅट असून तिने सुमारे दहा वेळा विदेशी दौरे केल्याचेही तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
पर्वरी येथे काल सोमवारी दक्षता संचालनालयाने आयोजित केलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत वित्त प्रधान सचिव डॉ. व्ही. कांदावेलू, दक्षता विभागाच्या संचालक यशस्वीनी बी., भ्रष्टाचारी विरोधी विभागाचे अधीक्षक नेल्सन आल्बुकर्क उपस्थित होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांनी काम करताना सतर्क राहण्याची गरज आहे. सरकार वा प्रशासनाशी कोणताही संबंध नसताना एका महिलेने सरकारी नोकऱ्या देण्याच्या बहाण्याने अनेकांना गंडा घातला आहे, ही गोष्ट गंभीर स्वऊपाची आहे.
भ्रष्टाचाऱ्याची गय केली जाणार नाही
सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात आतापर्यंत नऊजणांना अटक झालेली आहे. यात दोन सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील एक कर्मचारी सेवेत आहे, तर दुसरा निवृत्त झालेला आहे. अशा प्रकरणांत सहभागी असलेल्यांची अजिबात गय केली जाणार नाही. त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.
न खाऊंगा, ना खाने दूँगा
सरकारी कर्मचाऱ्यांचे वर्तन ‘न खाऊंगा, ना खाने दूंगा’ या धोरणानुसार असायला हवे. कामात दिरंगाई करणे हा सुद्धा भ्रष्टाचाराचाच प्रकार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. भ्रष्टाचार एखाद्या लहान पातळीवरून सुऊ होता आणि तो इतरांनाही त्रासात टाकतो. गेल्या आठ ते दहा दिवसात फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले ते गंभीरस्वरूपाचे आहेत. एक महिला आपण अधिकारी आहे असे सांगून गेली 12 वर्षे लोकांना नोकरीचे आमिष दाखवून फसवत आहे, ही मोठी गंभीर बाब आहे.
दिवाळीत भ्रष्टाचारऊपी नरकासूराचे दहन
राज्यातील भ्रष्टाचार आम्हाला पूर्णपणे निपटून काढायचा आहे. या दिवाळीत भ्रष्टाचारऊपी नरकासूराचे दहन करा आणि गोवा कायमचा भ्रष्टाचारमुक्त करा. कुठलाही अधिकारी, राजकारणी किंवा इतर कोणी भ्रष्टाचारात आढळला तर माझ्या हातातून सुटणार नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
कर्मचाऱ्यांनी फोनवर बोलताना सावध
प्रशासनातील प्रत्येक कर्मचारी ते मग अधिकारीसुद्धा असले तरी त्यांनी फोनवर बोलताना सावध रहावे. तंत्रज्ञानाचा दुऊपयोग केला जात आहे. एकादा माणूस कोणतेही काम घेऊन आला असेल तर त्याचा हेतू ओळखणे गरजेचे आहे. एखादा माणूस फोनवर बोलत असेल तर तो कोण, काय बोलतो हे बारकाईने तपासावे. साध्या कारकुनापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी सावध रहावे, असे मुख्यमंत्री म्हणाले
पूजाला चार महिन्यांपूर्वी झाली होती अटक
पूजा नाईक चार महिन्यांपूर्वी एका व्यक्तीला घेऊन आपल्या घरी आली होती. काही खाजगी बोलायचे आहे, असे तिने मला सांगितले. तेव्हाच तिच्याबाबत आपणास संशय आला होता. त्यानंतर महिला शिपायाला बोलावून याबाबतची माहिती आपण डिचोली पोलिसांना दिली. त्यावेळी तिला अटक आणि चौकशी करून सोडण्यात आले होते. यापूर्वी पूजाला तीनवेळा अटक झालेली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.