For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

त्विशा शर्मा मृत्यूप्रकरणी तपासास वेग

06:33 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
त्विशा शर्मा मृत्यूप्रकरणी तपासास वेग
Advertisement

सासरच्या घरी सीबीआयचा ‘आत्महत्या देखावा’

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

मध्यप्रदेशात गाजत असलेल्या त्विशा शर्मा मृत्यूप्रकरणी सीबीआयकडून तपास कार्यास वेग देण्यात आला आहे. सोमवारी त्विशा शर्मा हिच्या सासरच्या घरी ‘प्रतिकृती आत्महत्या प्रात्यक्षिक करण्यात आले. 80 किलो वजनाच्या एका पुतळ्याला आत्महत्या केल्याप्रमाणे पंख्याला लटकविण्यात आले आणि आत्महत्येचा देखावा निर्माण करण्यात आला. त्विशा शर्मा हिने आत्महत्या केल्याचे तिच्या सासरच्या लोकांचे म्हणणे आहे. मात्र, या म्हणण्यावर संशय व्यक्त होत आहे.

Advertisement

नेमका कोणत्या परिस्थितीत आणि अशा प्रकारे त्विशा शर्मा हिचा अनैसर्गिक मृत्यू घडला, याची माहिती घेण्याचा सीबीआयचा प्रयत्न आहे. यासाठी हा आत्महत्येचा देखावा निर्माण करण्यात आला होता. शर्मा हिचा मृत्यू तिच्या सासरच्या घरी झाला होता. मात्र, हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारिरीक छळ करण्यात आला होता, असा तिच्या माहेरच्या कुटुंबियांचा आरोप आहे. या प्रकरणी  प्रथम मध्यप्रदेश पोलिसांनी तपास केला होता. आता तो सीबीआय करीत आहे.

गुन्हावैज्ञानिकांकडून तपासणी

सीबीआय अधिकाऱ्यांसह दोन गुन्हाविज्ञान तज्ञांनीही घटनास्थळाची तपासणी करुन पुरावे गोळा केले आहेत. फास घेतल्यानंतर शरीराची स्थिती कशी असू शकते याची तपासणी त्यांनी केली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीने स्वत:च्या हाताने गळफास लावून घेतल्यास फासावर लटकलेल्या शरीराच्या स्थिती विशिष्ट प्रकारची असते. तर कोणी अन्य व्यक्तीने फास लावून हत्या केल्यास शरीराची स्थिती वेगळ्या प्रकारची असते. गळा कोणत्या स्थानी दाबला गेला आहे, याचे निरीक्षण करुन ही आत्महत्या आहे, की हत्या आहे, याचा छडा लावला जातो. त्विशा शर्मा  हिच्या आत्महत्येसंबंधी संशय असल्याने ही सखोल तपासणी केली जात आहे.

गिरीबाला सिंग यांचीही उपस्थिती

आत्महत्येचा प्रसंग पुनर्निर्मित करत असताना, या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्विशा शर्मा हिची सासू गिरीबाला सिंग हिलाही उपस्थित ठेवण्यात आले होते. सिंग यांनी दिलेला जबाब आणि गुन्हाविज्ञानाच्या माध्यमातून संकलित करण्यात आलेला पुरावा, यांची तुलना करण्यासाठी तिला घटनास्थळी उपस्थित ठेवण्यात आले होते, अशी माहिती देण्यात आली. गिरीबाला सिंग सध्या सीबीआयच्या कोठडीत असून त्विशा शर्मा हिचा पती समर्थ यालाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल आणि निश्चित निष्कर्षापर्यंत पोहचणे शक्य होईल, असे सीबीआय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

फोन कॉल्सची तपासणी

त्विशा शर्मा हिचा मृत्यू झाल्यानंतर तिचा पती समर्थ सिंग हा तीन दिवस भोपाळमध्येच होता. त्यानंतर तो तेथून नाहीसा झाला. त्याच्यावर आणि गिरीबाला सिंग हिच्यावर पुरावे नष्ट केल्याचाही आरोप आहे. समर्थ सिंग याचे फोन कॉल्स आणि मेसेजेसही सीबीआयकडून तपासण्यात येत असल्याचे स्पष्ट केले गेले.

Advertisement
Tags :

.