For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेंगराचेंगरी प्रकरणाच्या तपासाला गती

06:39 AM Jun 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
चेंगराचेंगरी प्रकरणाच्या तपासाला गती
Advertisement

सीआयडीकडून तीन आरोपी संस्थांची होणार चौकशी : घटनास्थळी केली पाहणी

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

आरसीबी संघाच्या विजयोत्सवावेळी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या तपासाला सीआयडीने गती दिली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी), कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (केएससीए) आणि डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी यांच्या प्रमुखांची चौकशी करण्यास सीआयडीचे पथक सज्ज झाले आहे.

Advertisement

सीआयडीच्या अधीक्षक शुभन्विता यांच्या नेतृत्वाखाली डीवाएसपी पुरुषोत्तम आणि गौतम यांचा समावेश असणाऱ्या पथकाने चेंगराचेंगरी प्रकरणाचा तपास हाती घेतला असून चौकशी करावयाच्या व्यक्तींची यादी तयार केली आहे. या प्रकरणात अटकेत असलेले आरसीबीचे फ्रँचायझी मार्केटींग विभाग प्रमुख निखिल सोसले, कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या डीएनए एन्टरटेन्मेंट कंपनीचे प्रतिनिधी सुनील मॅथ्यू, किरण आणि सुमंत यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. शनिवारी बकरी ईद आणि रविवार सुटीचे दिवस असल्याने सोमवारी बॉडी वॉरंटवर या आरोपींना सीआयडीचे पथक आपल्या ताब्यात घेऊन चौकशी करणार आहे.

चिन्नास्वामी स्टेडियमलाही सीआयडीच्या पथकाने भेट दिली. येथील गेट क्र. 7, 19, 18, 16 आणि 21 जवळ मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली होती. येथील परिसराचीही या पथकाने पाहणी करून माहिती घेतली आहे.

मॅजिस्टेटकडूनही तपास गतिमान

बेंगळूर शहर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांनी चेंगराचेंगरी प्रकरणाच्या तपासाला गती दिली आहे. या घटनेत जखमी झालेल्यांपैकी किती जणांना बौरिंग, फोर्टीस, मणिपाल आणि वैदेही इस्पितळात दाखल करण्यात आले, किती जणांना डिस्चार्ज देण्यात आला, इस्पितळात दाखल करण्याचे कारण कोणते, याची माहिती मॅजिस्टेटनी जमा केली आहे. अद्याप उपचार घेत असलेल्या आणि डिस्चार्ज घेऊन परतलेल्यांच्या घरी जाऊन 25 हून अधिक जखमींना नोटीस बजावण्यात आली आहे. घटना घडलेल्या दिवशीच सरकारने तपास मॅजिस्टेटकडे सोपविला होता. त्यांच्याकडून 15 दिवसांत अहवाल देण्याची सूचना करण्यात आली होती.

केएससीएच्या सचिव, खजिनदारांचा राजीनामा

संपूर्ण देशाला हादरवून टाकलेल्या बेंगळूरमधील चेंगराचेंगरीच्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत केएससीएचे सचिव ए. शंकर आणि खजिनदार ई. एस. जयराम यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. केएससीएचे अध्यक्ष रघुराम भट यांना पाठविलेल्या पत्रात ए. शंकर आणि जयराम यांनी मर्यादित भूमिका असून देखील नैतिक जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. घटनेसंदर्भात आरसीबी संघ व्यवस्थापनाच्या चार अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केएससीएच्या पदाधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

आरसीबीविरुद्ध तिसरा एफआयआर

आरसीबी संघाच्या विजयोत्सवावेळी घडलेल्या दुर्घटनेसंबंधी आरसीबी व्यवस्थापन, डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट आणि केएससीएविरुद्ध तिसरा एफआयआर दाखल झाला आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेत जखमी झालेल्या बी. कॉम विद्यार्थ्याने बेंगळूरच्या कब्बनपार्क पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून हा एफआयआर दाखल झाला आहे. आरसीबीची जाहीरात आणि मोफत तिकिटाची संधी असल्याचे समजताच मी चिन्नास्वामी स्टेडियमजवळ गेलो होते. स्टेडियमच्या गेट क्र. 6 व चेंगराचेंगरी झाली. बॅरिकेड तुटून तेव्हा माझ्या उजव्या पायावर पडला, असे तक्रारदार विद्यार्थी वेणू याने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.