केजरीवाल यांच्या घोषणांची चौकशी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीची विधानसभा निवडणूक आता जवळ येत आहे. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या महिलांसाठी सन्मान योजना आणि संजीवनी योजना यांची घोषणा केली आहे. तसेच महिलांनी या योजनेत सहभाग व्हावे, म्हणून त्यांची नावे आणि व्यक्तीगत माहिती संकलित करण्यासाठी अभियानही चालविले आहे. मात्र, अशा प्रकारे लोकांची नावे आणि व्यक्तीगत माहिती गोळा करण्याच्या प्रकाराची चौकशी करण्याचा आदेश दिल्लीच्या उपराज्यपालांनी दिला आहे. या आदेशावर केजरीवाल यांनी टीका केली आहे.
दिल्लीमध्ये महिलांसाठी योजना सुरु आहेत, असे विधान केजरीवाल यांनी केले होते. या योजनांचा विस्तार निवडणुकीनंतर करण्यात येईल, असेही त्यांचे प्रतिपादन होते. तथापि, अशा कोणत्याही योजना दिल्लीत सुरु नाहीत, असे स्पष्टीकरण दिल्लीच्या सरकारी अधिकाऱ्यांनीच दिल्याने केजरीवाल यांची कोंडी झाली होती. अशी कोणतीही योजना सध्या सुरु नसताना केजरीवाल किंवा दिल्ली प्रशासन यांना महिलांची माहिती घेण्याचा अधिकार असा पोहचतो ? असा प्रश्न भारतीय जनता पक्षाने केला आहे. या व्यक्तीगत माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो, असाही आरोप या पक्षाने केला आहे. तसेच दिल्लीच्या उपराज्यपालांनीही महिलांची व्यक्तीगत माहिती संकलीत करण्याच्या प्रकाराच्या चौकशीचा आदेश दिला आहे.
योजनांची मुस्कटदाबी
भारतीय जनता पक्षाने आमच्या योजनांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. दिल्लीच्या जनतेला काहीही मिळू नये अशी या पक्षाची इच्छा आहे. त्यामुळे आमच्या योजनांची चौकशी करण्याचा घाट या पक्षाने घातला आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली. कोणत्याही परिस्थितीत या योजना आम्ही लागू करुच, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. दिल्लीच्या महिलांना लाभ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न वाया जाणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
योजना काय आहेत
महिला सन्मान योजनेच्या अंतर्गत दिल्लीतील 18 वर्षांवरील प्रत्येक महिलेला महिन्याला 2,100 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटीही घोषित करण्यात आल्या आहेत. तसेच संजीवनी योजनेच्या माध्यमातून दिल्लीतील 60 वर्षांवरील सर्व नागरीकांना विनामूल्य वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत. तथापि, या योजना आता तांत्रिक वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
पैशाच्या वाटपाचा आरोप
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्ष मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मतदारांना पैसे वाटले जात आहेत. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच शेकडो कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून पैसे वाटप होत असल्याचे व्हिडीओही समोर आले आहेत. आम्ही मात्र लोकांच्या कल्याणाचा ध्यास घेतला आहे, असे प्रतिपादन केजरीवाल यांनी केले.