Kolhapur : ‘गोकुळ’ दूध संघाच्या जाजम-घड्याळ खरेदी प्रकरणाची चौकशी सुरू
तक्रारदारांच्या पाठपुराव्यानंतर ‘गोकुळ’ चौकशीला वेग
कोल्हापूर : 'गोकुळ" दूध संघाने दूध संस्थांना देण्यासाठी खरेदी केलेला जाजम व घडळ्याची चौकशी मंगळवारपासून सुरू झाली आहे. मुख्य चौकशी अधिकारी तथा द्वितीय विशेष लेखापरीक्षक वर्ग -१ (साखर) सातारा सदाशिव गोसावी यांच्यासह तिघांच्या पथकाने तपासणी सुरू केली असून, साधारणतः आठ दिवस हे काम चालणार आहे.
खुल्या निविदाबिना संचालक मंडळाने चार कोटींची खरेदी केल्याची तक्रार आहे. 'गोकुळ'ने हिरक महोत्सवी वर्षानिमित्त दूध संस्थांना देण्यासाठी जाजम व घड्याळ खरेदी केली होती. साधारणतः सहकारी संस्थांमध्ये होणाऱ्या खरेदी या खुल्या निविदांच्या माध्यमातून केली जाते. पण, सुमारे चार कोटी किमतीचा जाजम व घड्याळ्याची खरेदी केवळ कोटेशनवर केली आहे.
याबाबत, उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी याबाबत दुग्ध विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, विभागीय उपनिबंधक (दुग्ध) राजकुमार पाटील यांनी तत्कालीन विशेष लेखापरीक्षक सहकार संस्था वर्ग-२ (पदुम) सांगली सदाशिव गोसावी यांची २४ ऑगस्टला नियुक्ती केली. सुरुवातीच्या टप्प्यात पुरेसे कर्मचारी नसल्याने चौकशीला विलंब झाला. तोपर्यंत २४ सप्टेंबरला गोसावी यांची पदोन्नतीवर बदली द्वितीय विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ (साखर) सातारा या पदावर झाली. त्यामुळे चौकशीला खो बसला होता. तक्रारदारांनी रेटा लावल्यानंतर सदाशिव गोसावी यांनी मंगळवारपासून चौकशी सुरू केली आहे. साधारणतः आठ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
'गोकुळ'च्या जाजम, घड्याळ खरेदीची चौकशी सुरू केली आहे. तपासणीसाठी किती दिवस लागतील, हे आताच सांगता येणार नाही.
-- सदाशिव गोसावी (चौकशी अधिकारी)