For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘नीट’ पेपरफुटीसंबंधी सहा राज्यांमध्ये तपास

07:00 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘नीट’ पेपरफुटीसंबंधी सहा राज्यांमध्ये तपास
Advertisement

सीबीआयने पाटण्यातून दोघांना केली अटक : झारखंडमधून मुख्याध्यापक ताब्यात : दिल्लीत संसदेला घेराव घालण्यासाठी जाणाऱ्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने गुरुवारी अटकेची पहिली मोठी कारवाई केली. सीबीआयने या प्रकरणातील आरोपी मनीष प्रकाश आणि आशुतोष यांना बिहारची राजधानी पाटणा येथून अटक केली आहे. सध्या सीबीआय या दोघांची चौकशी करत आहे. तसेच झारखंडमधून एका शाळेच्या मुख्याध्यापकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. ‘नीट’ पेपर लीक प्रकरणी सध्या सहा राज्यांमध्ये तपास केला जात असतानाच गुरुवारी संसदेला घेराव घालण्यासाठी आलेल्या भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना बॅरिकेड्स उभारून रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याने काहीवेळ गोंधळ आणि तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

Advertisement

सरकारने ‘नीट’ पेपरचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. सीबीआयचे वेगवेगळे पथक बिहार आणि गुजरातमध्ये तळ ठोकून आहेत. सीबीआयने रविवारी याप्रकरणी पहिला एफआयआरही नोंदवला होता. यानंतर राज्य सरकारांनी नोंदवलेली पाच प्रकरणेही ताब्यात घेण्यात आली. याआधी बुधवारी सीबीआयच्या पथकाने झारखंडमधील हजारीबाग येथील एका खासगी ओएसिस शाळेच्या मुख्याध्यापकाची चौकशी केली होती. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी मुख्याध्यापकाची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘नीट’मधील अनियमिततेच्या आरोपांच्या चौकशीच्या संदर्भात दिल्लीहून सीबीआयचे एक पथक सोमवारी सकाळी पाटणा येथील बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे युनिट कार्यालयात पोहोचले. बिहार पोलिसांच्या माध्यमातून सुरू झालेला परीक्षेच्या पेपर लीकचा तपास आता बिहारच्या आर्थिक गुन्हे युनिटनंतर केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे. बिहारच्या तपास पथकाने सर्व पुरावे व माहिती शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार सीबीआयकडे दिली आहे.

सीबीआय पथकाची तपास अधिकाऱ्यांशीही चर्चा

तपास हाती घेतल्यानंतर सीबीआयच्या पथकाने बिहार पोलिसांच्या इकॉनॉमिक ऑफेन्स युनिट (ईओयू) कार्यालयात पोहोचून तेथील तपास अधिकाऱ्यांशीही संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी सर्व पुरावे हाती घेतले. 5 मे ते 10 जून या कालावधीत पोलीस आणि गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासासंबंधीची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी जाणून घेतली.

Advertisement
Tags :

.