ऐश्वर्या गौडा प्रकरणात चौकशीला गती
ईडीचे 14 ठिकाणी छापे : महत्त्वाची कागदपत्रे जप्त, आमदार विनय कुलकर्णी अडचणीत येण्याची शक्यता
प्रतिनिधी/ बेंगळूर
माजी खासदार डी. के. सुरेश यांचे नाव वापरून फसवणूक केलेल्या ऐश्वर्या गौडा प्रकरणाच्या तपासाला ईडीने गती दिली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी माजी मंत्री आणि विद्यमान काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी आणि शिल्पा गौडा यांच्या निवासस्थानांसह 14 ठिकाणी छापे टाकले आहेत. छाप्यादरम्यान महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. तसेच आमदार विनय कुलकर्णी यांचे ऐश्वर्या गौडा यांच्याशी असलेल्या व्यवहारांचे गुपित उघड झाले असून दोघांनीही कोट्यावधी ऊपयांची देव-घेव केल्याचे चौकशीदरम्यान उघड झाले आहे. त्यामुळे आमदार विनय कुलकर्णी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
योगेश गौडा हत्या प्रकरणात मदत करणाऱ्या ऐश्वर्याने विनय कुलकर्णी यांच्याकडून 24 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. तसेच दररोज 24 लाख रुपये व्याज देण्याची वस्तुस्थिती आता समोर आली आहे. ऐश्वर्या आणि काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांच्यातील 24 कोटी ऊपयांच्या व्यवहारावरून ईडीच्या अधिकाऱ्यांनी कुलकर्णी यांच्या घरावर छापा टाकला. तसेच तब्बल 26 तास कारवाई करत अनेक कागदपत्रे गोळा केली. योगेश गौडा हत्या प्रकरणात तिने आमदार विनय कुलकर्णी यांनाही मदत केल्याची माहिती आहे.
ऐश्वर्याने 24 कोटींचे घेतले होते कर्ज
विनय कुलकर्णी यांच्याकडून 24 कोटी रु पयांचे कर्ज घेतलेल्या ऐश्वर्याने दररोज 1 टक्के व्याज देण्याचे सांगितले होते. त्यानुसार 24 कोटींसाठी दररोज 24 लाख रु पये व्याज देण्याचे आश्वासन देऊन पैसे घेतले होते. पण पैसे मिळाल्यानंतर तिने मुद्दल किंवा व्याज न देता वेळ मागितला होता. यावेळी विनय कुलकर्णी यांनी ऐश्वर्याशी वाटाघाटी करून करार केल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे.
ईडीच्या चौकशीदरम्यान, योगेश गौडा हत्या प्रकरणातील साक्षीदाराशी छेडछाड करत असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणातील साक्षीदार बसवराज मुत्तगी याला ऐश्वर्याने ट्रॅप केले होते. योगेश गौडा खून प्रकरणातील आरोपी लक्ष्मणने बसवराज मुत्तगी याला फोन करून पैसे देण्याचे आमिष दाखवून कॉल रेकॉर्ड केला होता. नंतर उच्च न्यायालयात हा ऑडिओ सादर करून पुरावे रद्दची मागणी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. पण सीबीआयने हे प्रकरण न्यायालयाकडे सोपवले होते. त्यामुळे माफीची साक्ष रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयात फेटाळण्यात आली होती.