For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उषाराणी हत्तीणीच्या मृत्यूबाबत ट्रस्टची चौकशी करा

12:06 PM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
उषाराणी हत्तीणीच्या मृत्यूबाबत ट्रस्टची चौकशी करा
Advertisement

सांगली येथील मनेका गांधी यांच्या ‘पिपल फॉर अॅनिमल्स’च्या पदाधिकाऱ्यांची मागणी : पीसीसीएफ यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : चिकोडी तालुक्यातील देशभूषण दिगंबर जैन शांतगिरी ट्रस्ट कोथळी येथील एका मादी जातीच्या हत्तीला बांधून ठेवल्याने पावलांना जबर दुखापत झाली. ही जखम दिवसेंदिवस वाढत चालली. पशुवैद्यकीय तज्ञांनी तिचे पुनर्वसन करावे, अशी सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी दुर्दैवाने उषाराणी नावाच्या या मादी हत्तीचा मृत्यू झाला. या दुर्लक्षाबद्दल ट्रस्टची सखोल चौकशी करावी व योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सांगली येथील मनेका गांधी यांच्या ‘पिपल फॉर अॅनिमल्स’च्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी कर्नाटक राज्याचे प्रिन्सिपल चिफ कॉन्झरवेटीव्ह ऑफ फॉरेस्ट अॅण्ड हेड ऑफ फॉरेस्ट (पीसीसीएफ) यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मादी हत्तीची योग्य अशी काळजी घेतली नाही, पशूवैद्यकीय तज्ञांनी तिचे पुनर्वसन करण्यासाठी स्थलांतर करावे, अशी सूचना केली होती. परंतु त्याकडे ट्रस्टने पूर्ण दुर्लक्ष केले. काही व्यक्तींच्या स्वार्थामुळे उषाराणीचे स्थलांतर केले नाही. शिवाय तिची योग्य ती काळजी घेतली नाही.

Advertisement

उषाराणी उत्पन्नाचे मोठे साधन होते. आजपर्यंत स्थलांतराचा पास न घेता तिचा वेगवेगळ्या मिरवणुकीसाठी उपयोग करून घेण्यात आला. याबद्दल तक्रारी करूनही काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे प्रकरण दाबले गेले. उषाराणीच्या प्रकृतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने तिच्या वेदना वाढत जाऊन दुर्दैवाने मृत्यू झाला. इतकेच नव्हे तर आता तिचा मृत्यू होऊन दोन दिवस उलटत नाही तोपर्यंत नवीन हत्ती आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. तेव्हा यावर त्वरित नियंत्रण आणावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. या शिवाय रायबाग तालुक्यातील अलकनूर येथील करीसिद्धेश्वर देवस्थानच्या ध्रृव नावाच्या हत्तीच्या प्रकृतीची हेळसांड होत आहे. त्याच्या पायाला जखमा झाल्या असून त्याच्यावर उपचार केले जात नाहीत. तेव्हा याबाबतही आपण त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

पुरावे द्या, कारवाई करू

याबाबत ‘तरुण भारत’ प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधता आपण याची योग्य ती दखल घेऊ, असे त्यांनी सांगितले. कोणत्याही प्राण्यांवर कोणत्याही स्वरुपाचे अत्याचार केले जाऊ नयेत, त्यांना त्रास दिला जाऊ नये, असे कायदाही सांगतो. सांगलीच्या ज्या संघटनेने हत्तीवर योग्य उपचार केले नाहीत, असे आरोप केले आहेत. त्यांनी मला योग्य ते पुरावे द्यावेत. त्यानंतर आपण योग्य ती कारवाई निश्चितपणे करू. तसेच अलकनूर येथील ध्रृव या हत्तीकडेही दुर्लक्ष होत असल्याचे पुरावे संघटनेने द्यावेत. आपण त्या हत्तीचे योग्य ते पुनर्वसन करून स्थलांतर करू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

 -जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

सांगलीच्या संघटनेने केलेले आरोप पूर्णत: चुकीचे

सदर संघटनेने केलेले आरोप तथ्यहीन व निरर्थक आहेत. उषाराणी हत्तीणी म्हणजे गावचे भूषण होते. आमच्या गावचे अपत्य असल्याप्रमाणे आम्ही उषाराणीची सर्व ती काळजी घेतली असून उपचारही केले आहेत. उपचार करणाऱ्या  डॉक्टरांकडे सर्व तपशील उपलब्ध आहे. कोथळीमध्ये चाऱ्याची व्यवस्था होऊ शकली नाही. म्हणून आम्ही उषाराणीला बेडकीहाळमध्ये आणून ठेवले. तिच्या मृत्यूनंतर निघालेल्या मौन फेरीमध्ये संपूर्ण ग्रामस्थ सहभागी झाले होते. आम्ही उषाराणीची सर्वपरीने काळजी घेतली असून पिपल फॉर अॅनिमल्स या सांगलीच्या संघटनेने केलेले आरोप पूर्णत: चुकीचे आहेत.

-इंद्रजित पाटील, पदाधिकारी देशभूषण दिगंबर जैन शांतगिरी ट्रस्ट 

Advertisement
Tags :

.