सिंधुरत्न योजनेत झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करा
ठाकरे सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सावंतवाडी । प्रतिनिधी
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने सिंधुरत्न योजनेत झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे. यामध्ये विशेषत: विद्युत ट्रान्सफॉर्मरशी संबंधित कामांमध्ये निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सिंधुरत्न योजनेच्या अंतर्गत केलेल्या सर्व कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
शिवसेनेने असे म्हटले आहे की, सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी निधीचा मनमानी पद्धतीने वापर केला असून, त्याचे सार्वजनिक हितापेक्षा वैयक्तिक किंवा व्यावसायिक हित साधण्यासाठी गैरवापर केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये विशेषतः विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या मंजुरी प्रक्रियेतील अपारदर्शकता आणि काही खास व्यक्तींना लाभ देण्यासाठी निधीचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.
शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना ही मागणी करताना योजनेच्या संपूर्ण खर्चावर आणि मंजूर करण्यात आलेल्या कामांच्या निकषांवर लक्ष ठेवून चौकशी करण्याचे आवाहन केले आहे.यावेळी निवेदन देताना जिल्हाप्रमुख श्री बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख श्री रुपेश राऊळ, तालुकाप्रमुख श्री यशवंत परब, माजी जिल्हाप्रमुख श्री रमेश गावकर उपस्थित होते.