नवजात शिशू मृत्यू प्रकरणाची चौकशी करा
विविध संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेल्या 111 नवजात शिशू मृत्यू प्रकरणाच्या विरोधात ऑल इंडिया महिला सांस्कृतिक संघटना व ऑल इंडिया डेमोक्रॅटिक युथ ऑर्गनायझेशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिशू मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना संघटनेच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेच्या जिल्हा संचालक गंगा कोकरे, राजू गाणगी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
वेळेत ऑक्सिजन न मिळाल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यात 111 शिशूंचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. सरकारी इस्पितळ म्हणजे गरिबांचे इस्पितळ अशी समज आहे. मात्र, योग्य व्यवस्थेअभावी सरकारी इस्पितळातील मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. ही गोष्ट धक्कादायक आहे. या प्रकरणाची चौकशी करून पायाभूत सुविधा न पुरविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, डायलेसिससाठी आवश्यक यंत्रणा पुरवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.