घुसखोरांना भूमी बळकावू देणार नाही !
झारखंड राज्यातील प्रचारसभेत शहांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडमधील वनवासींची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. बांगलादेशातील घुसखोर झारखंडमधील वनवासी समुदायांच्या महिलांशी विवाह करुन त्यांची भूमी बळकावत आहेत. राज्यात भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांचे सरकार आल्यास अशी भूमी बळकविण्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी या राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या प्रचारसभेत दिले.
गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील गरहवा येथे आयोजित निवडणूक प्रचारसभेतही घुसखोरांविरोधात इशारा दिला होता. वनवासी महिलांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन बांगलादेशातून येथे येणारे घुसखोर त्यांच्याशी विवाहसंबंध प्रस्थापित करतात. नंतर या संबंधांच्या माध्यमातून या महिलांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भूमी बळकाविली जाते. वनवासींना बेघर केले जाते. या बेघर झालेल्या वनवासींवर नंतर शहरांमध्ये जाऊन मोलमजुरी करत गरिबीत दिवस कंठण्याची वेळ येते. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यास या प्रकारांना आळा घालण्यात येईल. वनवासींची भूमी मुक्त करण्यात येईल. घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशा अर्थाचे प्रतिपादन त्यांनी केले होते.
काँग्रेस-झामुमो सरकारवर टीका
झारखंडमधील काँग्रेस आणि झामुमो युतीचे सरकार घुसखोरांकडून केल्या जाणाऱ्या अतिक्रमणाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. बांगलादेशी मुस्लीम घुसखोरांची संख्या वाढवून आपली मतपेढी मोठी करण्याचा प्रयत्न या सरकारकडून होत आहे. वनवासी समुदायांच्या दुर्दशेपक्षा या पक्षांना आपला राजकीय स्वार्थ श्रेष्ठ वाटतो. त्यामुळे हे राजकीय पक्ष घुसखोरीला एक प्रकारे प्रोत्साहनच देत आहेत, अशी कठोर टीकाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारसभेत केली.
अधिकाधिक लाभ मिळू देणार
काँग्रेसच्या काळात केंद्र सरकारने 1 रुपया दिला तर गरिबांपर्यंत केवळ त्यातील 15 पैसेच पोहचत होते. ही स्थिती काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधी यांनीच मान्य केली होती. मात्र, भारतीय जनता पक्षाचे राज्य झारखंडमध्ये आल्यास केंद्र सरकारच्या प्रत्येकी 1 रुपयामध्ये राज्य सरकारचे 25 पैसे घालून सव्वा रुपयाचा लाभ येथील गरिबांना दिला जाईल. केंद्र सरकारने सरकारी योजनांचा थेट लाभ गरिबांना देण्यासाठी त्यांच्या बँक खात्यांवर पैसे जमा करण्याची पद्धती निर्माण केल्यामुळे आज कोट्यावधी गरिबांना मोठा लाभ होत आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत झारखंडमध्ये आमचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन अमित शहा यांनी केले. झारखंडमध्ये 13 नोव्हेंबरला मतदानाचा प्रथम टप्पा होत आहे.