For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रस्तावना

06:19 AM Dec 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
प्रस्तावना
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

आपल्या हातून आपल्या आप्तांचा वध होणार किंवा जे आपल्या बाजूने लढणार आहेत ते आपल्यासाठी लढून मरण पावणार असे वाटून अर्जुन कौरवांशी लढण्यास तयार नव्हता. आता ह्यांच्या बुद्धीवर आलेले मायेचे पटल दूर केले पाहिजे हे भगवंतांनी ओळखले आणि त्यांनी त्यांना शरण आलेल्या अर्जुनाला उपदेश करायला सुरूवात केली. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात त्यांनी प्रथम सांख्यमार्ग सांगितला. त्यानुसार  सर्वांच्या शरीरात ईश्वरी अंश आत्म्याच्या रूपाने वास करत असतो. शरीर नष्ट झाले तरी आत्मा अमर असल्याने त्याला दुसरे शरीर प्राप्त होते. म्हणून प्रारब्धानुसार शरीर नाश पावले तर शोक करण्याचे काही कारण नाही. समोरचे कौरव त्यांच्या दृष्कृत्याचे प्रायचित्त म्हणून शरीराने नाश पावणार आहेत त्यामुळे त्यांच्या मरणाचे पाप अर्जुनाच्या माथी बसणार नाही. तसेच प्रत्येकाने आपला स्वधर्म निभावणे हेच श्रेयस्कर असते. असा उपदेश केला. येथे भगवंतांना स्वधर्म म्हणजे कर्तव्य असा अर्थ अभिप्रेत आहे. जो कर्तव्य निभवण्यात कुचराई करतो तो पापाचा धनी होतो तसेच त्याची दुष्किर्ती होते.

पुढे भगवंतांनी योगमार्ग सांगितला. त्यामध्ये समदृष्टिने कर्तव्य निभवण्याचे महत्त्व भगवंतांनी विशद केले. समदृष्टीने म्हणजे ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते निरपेक्षतेने करणे. अशी सद्बुद्धी थोडीशी जरी निर्माण झाली तरी ती संपूर्ण आयुष्य उजळून टाकते. निरपेक्षपणे कर्म केल्याने त्या कर्माचे पाप, पुण्य ते करणाऱ्याला लागत नाही. ह्या जन्मीचे प्रारब्धाचे भोग भोगून झाले की, नवीन पाप, पुण्य तयार होत नसल्याने माणसाचा आत्मा शरीरातून मुक्त होऊन ईश्वरी तत्त्वात विलीन होतो.

Advertisement

भगवंतांनी सांगितलेल्या दोन मार्गाबद्दल श्री गोंदवलेकर महाराज त्यांच्या दैनंदिन प्रवचनात म्हणतात, देवाकडे जाण्यासाठी गीतेमध्ये सांख्य व कर्म असे दोन मार्ग सांगितले आहेत. ज्यांची पहिल्यापासूनच वासना कमी असते, इंद्रियांवर ताबा असतो ते जन्मापासून तयार असतात ते सांख्यमार्गी होत. ज्यांच्या वासना पुष्कळ असतात, ते इंद्रियांच्या सांगण्यानुसार वर्तन करत असतात. असे असले तरी त्यांना पूर्वपुण्याईमुळे देव हवा असेही वाटत असते. असे सामान्यजन ते कर्मयोगी होत. सांख्यांचा साधनमार्ग अर्थात सूक्ष्म व उच्च प्रतीचा असतो. त्यामुळे ते चटकन देवाप्रती पोहोचतात. सामान्य लोकांचा मार्ग जड, सोपा व सुखकारक असतो. ते क्रमाक्रमाने देवापाशी पोहोचतात. सामान्य माणसांनी जोपर्यंत काही वासना होत असतात तोपर्यंत त्या योग्य मार्गाने तृप्त करण्याचा प्रयत्न करावा पण सृष्टीमधील सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्याने आपण करत असलेल्या प्रयत्नांचे फळ ईश्वराच्या इच्छेवर अवलंबून आहे हे ध्यानात बाळगून तो देईल त्यात समाधानी रहावे. वाट्याला आलेले कर्म निरपेक्षपणे करण्याचा सराव करावा.

सामान्य माणसाकडून भगवंतांना कोणती अपेक्षा आहे तेच श्रीमहाराजांनी प्रवचनात बोलून दाखवली असे म्हंटले तरी चालेल. ती अपेक्षा आपण पूर्ण करावी ह्या उद्देशाने भगवंतांनी आता आपण ज्याचा अभ्यास सुरू करणार आहोत त्या तिसऱ्या अध्यायात कर्ममार्ग सविस्तर उलगडून सांगितला आहे. म्हणून तिसऱ्या अध्यायचे नाव कर्मयोग असे आहे. त्यामध्ये कर्मयोग कसा अचारावा, त्यामध्ये कोणते अडथळे आहेत आणि त्यावर मात कशी करावी ह्याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन त्यांनी केले आहे.

                          क्रमश:

Advertisement
Tags :

.