For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीगणेशगीतेची ओळख

06:13 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीगणेशगीतेची ओळख
Advertisement

गीता, उपनिषद आणि ब्रह्मसुत्रे यांना प्रस्थानत्रयी म्हणतात. प्रस्थान म्हणजे मार्ग. ब्रह्मविद्या किंवा अध्यात्मविद्या प्राप्त करून घेण्याचे हे तीन ग्रंथ म्हणजे तीन मार्ग होत. जुन्या सदर्भग्रंथांप्रमाणे गणेशगीता ही आद्य गीता असून ती सर्व गीतांमध्ये जुनी आहे. श्री व्यासमुनींनी रचलेल्या गणेशपूराणातल्या 138 ते 148 या अकरा अध्यायातून ती प्रकट झालेली आहे. 414 श्लोकांची गणेशगीता म्हणजे श्रीगणेश व वरेण्यराजा या दोघांमधील संवाद आहे. या संवादातून अप्रतिम असा ज्ञानोत्तर कर्माचा गाभा आपल्यासमोर उलगडत जातो. आयुष्यात जे जे काही घडतंय ते सर्व ईश्वरी इच्छेनुसार घडत असून ते आपल्या पूर्वकर्माचं फळ आहे आणि जे घडतंय ते आपल्या हिताचं असल्याने आपण त्याचा सहज म्हणजे कोणतीही तक्रार न करता स्वीकार केला पाहिजे हे ज्याच्या लक्षात आलंय तो त्यानुसार त्याच्या स्वभावात बदल करतो तो आत्मज्ञानी असतो.

Advertisement

अशा आत्मज्ञानी व्यक्तीने वैराग्य धारण करण्यासाठी म्हणजे आहे त्या परिस्थितीत समाधानी राहण्यासाठी, वाट्याला आलेल्या कर्माकडे कसे पहावे, कोणत्या पध्दतीने कर्म करावे यासाठी श्रीगणेशांनी वरेण्यराजाला केलेला उपदेश या गीतेत आहे. आत्मज्ञान झालेला माणूस हा ईश्वराचं सगुण रूप असतो. त्यामुळे त्यानं केलेली कर्मे ही ईश्वरी कर्मे ठरत असल्याने ती व्यावहारिक कर्मापेक्षा उच्च दर्जाची असतात कारण त्यात नफ्यातोट्याचा हिशोब नसतो. म्हणून ही कर्मे लोककल्याणकारी असतात. श्रीगणेशांनी राजावर कृपेचा वर्षाव केलेला असल्याने त्याची बुद्धी मोक्षाच्या दिशेने झेपाऊ लागली आहे. ही त्याची उडी हनुमान उडी ठरावी म्हणून श्रीगणेशांनी त्याला गणेशगीता सांगितली आहे.

श्रीगणेशगीतेचा म्हणावा तसा प्रचार, प्रसार आजपर्यंत झालेला नाही. गणेशगीता मानवी आयुष्यातल्या शाश्वत सुखावर प्रकाश टाकते म्हणून या गीतेचा अभ्यास होणे आवश्यक आहे. ही बाब हेरून माझे स्नेही आणि गणेशभक्त श्री प्रदीप रामचंद्र रास्ते यांनी त्यांच्या ब्रह्मणस्पतिविश्व या ग्रंथमालेतील श्रीगणेशगीता हे दुसरे पुष्प श्रीगणेशचरणी अर्पण करून गणेशगीतेवरच्या भाष्य ग्रंथाची उणीव पूर्ण केली आहे. त्यांचा हा प्रयत्न व त्यासाठी त्यांनी घेतलेले अजोड परिश्रम नक्कीच कौतुकास्पद आहेत. त्यांच्या या अद्वितीय ग्रंथाचा आधार घेऊन आपण श्रीगणेशगीतेच्या अभ्यासाला प्रारंभ करूयात.

Advertisement

श्रीगणेशगीतेच्या अभ्यासाने व जीवनात ती प्रत्यक्ष उतरवायचा प्रयत्न केल्याने श्रीगणेशाची कृपा आपल्यावर होईल व जिवंतपणीच मोक्षाचा शुभ्र प्रकाश आपण अनुभवू शकू अशी खात्री वाटते. जिवंतपणी मोक्ष अनुभवणे म्हणजे काय यावर थोडा विचार करू. माणसाचं मन मोठं चंचल असतं. त्याला सतत बदल हवा असतो किंबहुना बदल अनुभवण्यासाठीच त्याची सगळी धडपड चालू असते. परंतु मोक्ष ही एक अशी अवस्था आहे की, ज्यामध्ये माणसाच्या मनाची, आहे या परिस्थितीत मला कोणताही बदल नको अशी बैठक तयार होते. अशी बैठक तयार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे बाह्य जगातील वस्तुंची आता गरज नाही अशी खात्री त्याला वाटत असते. सर्वांच्या जीवनात अशी परिस्थिती काही काळ येत असते. त्यावेळी वाटते की, आता सर्व काही आहे नव्याने काही नको म्हणून त्या काळात मनुष्य समाधानी असतो व जीवनाचा मनमुराद आनंद लुटत असतो पण मग काहीतरी घडतं, कुठंतरी मिठाचा खडा पडतो आणि त्यामुळे तो बेचैन होतो. मग त्याच्या मनात येतं, जुने दिवस किती सुखाचे होते. तसे दिवस फिरून पुन्हा यावेत. थोडक्यात मनुष्य सतत शाश्वत समाधानाच्या शोधात असतो. गणेशगीतेत सांगितलेली तत्वे माणसाने प्रत्यक्ष जीवनात आणल्यास त्याला शाश्वत समाधान मिळते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.