सावंतवाडी तालुक्यात ग्रामसेवकांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक प्रणाली आणा
मनसेची मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा केली आहे. तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांची भेट घेऊन या मागणीवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.गुरुदास गवंडे, मिलिंद सावंत, सुधीर दळवी, आणि राजू कासकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना या मागणीसाठी तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांची बैठक घेऊन त्यांना योग्य आदेश देण्याचे आश्वासन दिले. परंतु मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रणालीची अंमलबजावणी दहा दिवसांच्या आत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या मागणीसाठी मनसेने यापूर्वी उपोषणही केले होते. त्यावेळी गटविकास अधिकारी नाईक यांनी बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, अद्याप फक्त आंबोली, बांदा, माजगाव ग्रामपंचायतींमध्येच ही प्रणाली अस्तित्वात आली असून, उर्वरित ग्रामपंचायतींनी ही प्रणाली लागू केलेली नाही. ग्रामसेवकांच्या अनियमित हजेरीमुळे गावातील नागरिकांचे कामकाज अडते, असे सांगत ही प्रणाली तातडीने लागू करण्याची आवश्यकता असल्याची भूमिका मनसेने मांडली आहे.यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्यासाठी 15 व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर करण्याची मागणीही केली. तसेच, निगुडे गावात ओपन जिमसाठी मंजूर झालेल्या 10 लाख रुपयांच्या निधीचा अपव्यय झाल्याचा आरोपही करण्यात आला. मागासवर्गीय वस्तीमध्ये जिम उभारण्याचा ठराव असतानाही देऊळवाडीमध्ये जिम उभारण्यात आल्याचा मुद्दा उचलून धरला गेला.गुरुदास गवंडे यांनी या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून हा निधी मिळाल्याचे स्पष्ट केले .