भाजपकडून ‘संघराज्य’ धोरण राबविण्याचा प्रयत्न!
कोल्हापूर
आगामी लोकसभा निवडणूक, सध्याचे राजकीय धोरण, शहर व जिल्हा काँग्रेसची संघटनात्मक बांधणी आदी विविध घडामोडींबाबत ‘तरुण भारत’ चे विशेष प्रतिनिधी कृष्णात चौगले यांनी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय संदर्भ देत लोकसभेच्या राजकारणात नेमकी कोण बाजी मारेल ? आणि उमेदवार कसा असावा ? याचा ठोकताळा मांडला.
प्रश्न - स्थानिक स्वराज्य संस्था हा विकासाचा गाभा आहे. परंतू गेल्या दीड ते दोन वर्षापासून तिथे निवडणूका झालेल्या नाहीत. केवळ प्रशासक राज सुरु आहे. याबद्दल आपले काय मत आहे ?
उत्तर : राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांमध्ये दीड ते दोन वर्षांपासून प्रशासक राज सुरु आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दरवर्षी राज्य शासनाकडून 1 लाख 15 हजार कोटींचा निधी दिला जातो. पण सध्या सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे तेथे प्रशासकांमार्फत कामकाज सुरु आहे. सभागृहामध्ये लोकप्रतिनिधींकडून ज्या पद्धतीने जनहिताच्या, लोककल्याणकारी योजना राबविल्या जातात, त्यानुसार प्रशासकांच्या कालावधीत कोणतीही कामे झालेली नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता प्रशासकांच्या हातात गेल्यामुळे अनेक योजनांची कामे रखडली आहेत. तरीही भाजपकडून या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. त्यांना देशातील ‘स्थानिक स्वराज्य संस्थांची व्यवस्था मोडीत काढून ‘फेडरलिझम’ (संघराज्य पद्धती) चे धोरण राबवायचे आहे, असा घणाघाती आरोप विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला. भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणीवर टाकल्या जात असल्याचे स्पष्ट करून आमदार पाटील म्हणाले, ज्या देशात केंद्र आणि प्रादेशिक अशी द्विस्तरीय यंत्रणा असते त्यांना संघराज्य पद्धत किंवा संघराज्य व्यवस्था असे म्हटले जाते. या देशांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची यंत्रणा अस्तित्वात नसते. त्यामुळे या निवडणूका लांबणीवर टाकून भाजपला अशीच संघराज्य पद्धती अस्तित्वात आणायची आहे. जेणेकरून सर्व नियंत्रण त्यांच्या हातात राहू शकेल.
प्रश्न - आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असेल ? सध्या चर्चेतील पाच नावांपैकी कोणाच्या नावांवर शिक्कामोर्तब होईल ?
उत्तर : लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराकडे अर्थिक ताकदीबरोबरच भूताप्रमाणे राबणाऱ्या किमान पाच हजार कार्यकर्त्यांची फौज हवी. मतदारसंघाचे कार्यक्षेत्र पाहता प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणापर्यंत कार्यकर्त्यांची फळी हवी. तरच तो उमेदवार तळागाळापर्यंत पोहचू शकेल. त्यामुळे चर्चेत असणाऱ्या नावांपैकी कोणता नेता या निकषांमध्ये पात्र ठरणार की ऐनवेळी दुसरा कोणी ‘डार्क हॉर्स’ पुढे येणार हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.
प्रश्न : महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप जागा वाटप झालेले नाही. उमेदवारीवरून आही अंतर्गत मतभेत आहेत काय ?
उत्तर : लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला राज्यातील कोणत्या जागा मिळणे आवश्यक आहे, याबाबतची यादी वरिष्ठांकडे पाठवली आहे. आगामी 8 ते 10 दिवसांत महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होईल. महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडूण आणणे हा आमचा अजेंडा आहे. सध्या इच्छूक उमेदवार अनेक असले तरी ज्यांना उमेदवारी दिली जाईल, त्यांना निवडूण आणण्यासाठी ताकदीने प्रयत्न केले जातील. जागा वाटपावरून ‘मविआ’मध्ये कोणतेही अंतर्गत मतभेत नाहीत.
प्रश्न : जिल्हा नियोजनकडून विरोधकांना केवळ 10 टक्के निधी दिला जाणार असल्याचे समजते. याबाबत आपली काय भूमिका राहणार ?
उत्तर : जिह्यात काँग्रेसचे सहा आमदार असताना केवळ 10 टक्के निधीमध्ये त्यांच्या मतदारसंघात विकासकामे कशी करायची ? हा प्रश्न आहे. त्यामुळे या मतदारसंघातील जनतेवर अप्रत्यक्षरित्या अन्याय होणार आहे. जिल्हा नियोजनची 8 जानेवारीला बैठक आहे. या बैठकीपूर्वी विरोधी आमदारांना पुरेसा निधी देण्याबाबत पत्राद्वारे मागणी करणार आहे. तरीही निधीमध्ये वाढ केली नाही तर सदर बैठकीवर बहिष्कार टाकणार आहे.
प्रश्न : कोल्हापूर लोकसभा मतदासंघातून आमदार सतेज पाटील यांच्या कुटूंबातील उमेदवार असेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नेमके वास्तव काय आहे ?
उत्तर : मी आणि ऋतुराज पाटील आम्ही दोघेही राजकारणात आहोत. त्यामुळे लोकसभेसाठी पुन्हा आमच्याच कुटूंबातील तिसरा उमेदवार दिल्यास पारंपारिक विरोधक आणि आमच्यामध्ये काय फरक राहिला ? आमच्या कुटूंबात कोणी काय करायचे हे ठरलेले आहे. त्यामुळे कुटूंबातील आणखी कोणी तिसरा सदस्य राजकारणात येणार नाही.
प्रश्न: जिह्यात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी कशी आहे ?
उत्तर : जिह्यात कॉंग्रेसची मजबूत संघटनात्मक बांधणी केली आहे. बूथ कमिट्यांपासून तालुका आणि जिल्हा पातळीपर्यंतच्या सर्व कार्यकारिणी सक्षम आहेत. या पक्षीय बांधणीचा आगामी सर्व निवडणूकांमध्ये फायदा होणार आहे.