For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सराफी दुकान फोडणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक

07:58 AM Aug 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
सराफी दुकान फोडणाऱ्या  आंतरराज्य टोळीला अटक
Advertisement

17 लाखांचे चांदीचे दागिने, एक कार जप्त : कित्तूर पोलिसांची कारवाई

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

कित्तूर येथील सराफी दुकान फोडून चांदीचे दागिने पळविणाऱ्या राजस्थान व मध्यप्रदेशमधील गुन्हेगारांच्या एका टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यांच्याजवळून 17 लाख रुपये किमतीची 7 किलो चांदी व 5 लाख रुपये किमतीची आय-20 कार असा एकूण 22 लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

Advertisement

गुरुवार दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. कित्तूर येथील मानजा ज्वेलर्सच्या शटरला लावलेले कुलूप फोडून चोरट्यांनी सराफी दुकानात प्रवेश केला होता. दुकानातील फर्निचरला लावलेले कुलूप उचकटून चांदीचे दागिने पळविले होते. यासंबंधी सुब्रमण्य मार्तंडप्पा पत्तार, राहणार कित्तूर यांनी कित्तूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती.

वैज्ञानिक पद्धतीने चोरी प्रकरणाचा तपास

वैज्ञानिक पद्धतीने या चोरी प्रकरणाचा तपास हाती घेऊन पोलिसांनी राजस्थानमधील 4 व मध्यप्रदेशमधील एका गुन्हेगाराला अटक केली आहे. नारसिंग ऊर्फ पवन जितूसिंग, राहणार हनुटिया, राजस्थान, अर्जुनसिंग शिवसिंग, रा. धाकडी, मध्यप्रदेश, दिलीपसिंग देवीसिंग, रा. भिलोकाबडीया, लोकेश चिमणाराम मेघवाल, रा. शहापूर, नरेंद्र प्रभूजी ऊर्फ प्रभुलाल गुज्जर, रा. बेवरखास-राजस्थान अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली कित्तूरचे पोलीस निरीक्षक शिवानंद गुडगनट्टी, उपनिरीक्षक भरत एस., उपनिरीक्षक जी. जी. हंपण्णावर, आर. एस. सिली, एफ. ए. दफेदार, एस. एम. मुरगोड, ए. एम. चिक्केरी, एन. आर. गळगी, नागराज कडगन्नावर, एस. एम. बेटगेरी, दोडवाड पोलीस ठाण्यातील विठ्ठल नायक, तांत्रिक विभागाचे सचिन पाटील आदींचा समावेश असलेल्या पथकाने आंतरराज्य गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पाच जणांची कारागृहात रवानगी

चोरट्यांनी चांदीचे पैंजण, चांदीचे शिवलिंग, पादुका, गुंडगडगी पळविले होते. वैज्ञानिक पद्धतीने या प्रकरणाचा छडा लावण्यात आला आहे. राजस्थान व मध्यप्रदेशमधील गुन्हेगारांचा चोरी प्रकरणात सहभाग असल्याचे आढळून येताच पोलिसांनी आंतरराज्य गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून चोरीसाठी वापरण्यात आलेली आय-20 कारही जप्त केली आहे. या पाच जणांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.