शहरासह उपनगरातील चौक अतिक्रमणाच्या विळख्यात
कोल्हापूर :
कोल्हापूर शहरातील मुख्य चौक आणि उपनगरातील रस्ते तसेच चौक फेरीवाल्यांकडून व्यापले आहेत. मुख्य रस्त्याला लागूनच खाद्यपदार्थांसह अन्य विविध व्यवसायाच्या केबिन्स उभारण्यात आल्या आहेत. मात्र अशा व्यवसायाकाकडे पार्किंगची कोणतीही सुविधा नाही. यामुळे केबिन्सच्या समोरच वाहनांचे पार्किंग केले जात असून यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
फेरीवाला धोरण असले तरी कोल्हापूर शहरात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. फेरीवाल्यांची संख्या रोज वाढत आहे. रस्त्याच्या कडेला रिकामी जागा दिसली की त्याठिकाणी रात्रीच्या अंधारात खोके टाकून अतिक्रमण केले जात आहे. शहरात अधिकृत फेरीवाल्यांपेक्षा अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या मोठी आहे. या अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेचे नियंत्रण नाही. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला हे अतिक्रमण दिसत असूनही त्याकडे डोळेझाक होत असल्याचे दिसून येते. यामुळे अशा अनधिकृत फेरीवाल्यांना कोणाचे भय नाही. याचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस रोड ते हॉकी स्टेडियम चौक या मार्गावर रेणुका मंदिर चौकात, हॉकी स्टेडियम चौकात मोठया प्रमाणात रस्त्याच्या दोन्ही बाजूला हातगाड्या आहेत. संभाजीनगर सिग्नल चौक, क्रशर खण चौक, शेंडा पार्क चौक, बालिंगा रोडवरील नाका, रंकाळा टॉवर, राजारापुरीतील राजाराम रोड, जगदाळे हॉल शेजारील खाऊ गल्ली, रेड्याची टक्कर, शेंडा पार्क, आर.के.नगर नाका, शाहू जकात नाका ते शिवाजी विद्यापीठ मुख्य रोड या मार्गावर फेरीवाल्यांनी आपला पसारा मांडला आहे.
येथे येणाऱ्या ग्राहकांडून आपली वाहने फेरीवाल्यांच्या केबिनसमोरच समोर पार्क केली जाते. यामुळे रस्ता आणखी व्यापला जातो. फेरीवाल्यांच्या जाहिरातीचे फलक तर रस्त्याच्या मध्येच उभा केले जातात. यामुळे पादचाऱ्यांना या मार्गावरुन चालताना मुश्किल होते. बऱ्याच फूटपाथवर वाहनांचे पार्किंग होते. यामुळे एक प्रकारे पादचाऱ्यांचा हक्क हिरावून घेतला जात आहे. व्यावसायिकांचे फलक आणि ग्राहकांची वाहने मुख्य रस्त्यावर पार्क केली जात असल्याने अशा ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी होते. बऱ्याचवेळा अपघाताला निमंत्रण मिळते. अशा अपघातांना जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे.
- अनेक चौकात खोक्यामधून बेकायदेशीर व्यवसाय
शहरातील आणि उपनगरातील अनेक चौकात अनधिकृत खोकी आहेत. पण या अनधिकृत खोक्यापैकी काही खोक्यात व्यवसायही अनधिकृत सुरु आहेत. बहुतांश खोकी नावाला पानपटी आहेत. मात्र याठिकाणी महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा सहजपणे मिळतो. ज्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आहे ते कायद्याचे रक्षकच अशा पानपटीतून गुटख्याची पुडी तोंडात पुढे निघून जातात हे वास्तव आहे. मोरेवाडी जकात नाक्याच्या परिसरात तर गुटख्याबरोबर अवैध दारुही मिळते. अशा पानपटीसमोर नेहमी गर्दी असते. अशा ठिकाणी पोलीस आणि महापालिकेकडून कारवाई होण्याची गरज आहे.