For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खंडित वीजपुरवठ्याचा गणेशोत्सवाच्या तयारीला फटका

07:52 AM Sep 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
खंडित वीजपुरवठ्याचा  गणेशोत्सवाच्या तयारीला फटका
Advertisement

दुरुस्तीसाठी रविवारी सायंकाळपर्यंत वीज गुल

Advertisement

त. भा. प्रतिनिधी बेळगाव

वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी रविवारी शहरासह ग्रामीण भागातील अधिकतर भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. परंतु यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीला अडथळा निर्माण झाला. घरगुती डेकोरेशनसह मंडळांनाही मंडप घालताना वीज नसल्याने रविवारी सायंकाळपर्यंत थांबावे लागले. यामुळे गणेशभक्तांतून नाराजीचा सूर उमटला.

Advertisement

गणेशोत्सवात विजेची समस्या निर्माण होऊ नये यासाठी हेस्कॉमकडून रविवारी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. इतर दिवशी कारखाने, कार्यालये सुरू असल्याने वीजपुरवठा खंडित करणे शक्य होत नाही. त्यामुळे रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. परंतु याचा परिणाम गणेश भक्तांवर झाल्याचे दिसून आले.

सुटी असल्याने सकाळपासून घरगुती डेकोरेशन करण्यासाठी युवा वर्गाची धडपड सुरू होती. डेकोरेशनसाठी लागणारे अधिकतर साहित्य हे विजेवर अवलंबून असल्याने लाईट गुल होताच हे काम थांबले. सार्वजनिक मंडप उभारणीचे काम प्रगतीपथावर असून या कामालाही विजेअभावी ब्रेक लागला. नोकरदारांना तयारीसाठी मिळणाऱ्या सुटीदिवशीही वीज नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत होती.

शहरातील दक्षिण भागासह उत्तर भागातही वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. याचबरोबर ग्रामीण भागातही सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत वीजपुरवठा बंद होता. किमान यापुढे गणेशोत्सवापर्यंत सुरळीत वीजपुरवठा केला जावा, अशी मागणी केली जात आहे.

  ग्रामीण भागात अघोषित वीज कपात

बेळगाव

हेस्कॉमकडून मागील चार दिवसांपासून अघोषित वीज कपात केली जात आहे. गुरुवारपासून बेळगाव शहर वगळता ग्रामीण भागातील वीजपुरवठा ठप्प केला जात आहे. यामुळे दररोज दोन ते अडीच तास वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने याचा परिणाम ग्रामीण भागातील नागरिकांवर होत आहे. याबाबत हेस्कॉमकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागणीपेक्षा विजेची उपलब्धता कमी असल्याने केवळ बेळगावच नाही तर इतर जिल्ह्यांमध्येही वीज कपात केली जात आहे. शहरात व्यावसायिक आस्थापने अधिक असल्याने ग्रामीण भागात वीज कपात करण्यात आली आहे. यावर्षी धरणांमध्ये अतिशय कमी पाणीसाठा असल्याने याचा परिणाम वीज निर्मितीवर होत आहे. मागणी इतका वीजपुरवठा होत नसल्याने हेस्कॉमला वीज कपात करावी लागत आहे.

गुरुवारपासून वीज कपातीला सुरुवात झाली. सायंकाळी 5 ते 7.30 अथवा 5.30 ते 8 या वेळेत भार नियमन केले जात आहे. वीज कपातीपूर्वी किमान नागरिकांना हेस्कॉमकडून कळविणे आवश्यक होते. परंतु आजतागायत हेस्कॉमकडून या अघोषित वीज कपातीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याचा परिणाम ग्रामीण भागातील उद्योग व्यवसायावर होताना दिसत आहे.

ग्रामीण भागावरच अन्याय का?

शहरी भाग वगळता इतर ठिकाणी वीज कपात केली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिक वीज बिल भरत नाहीत का? ग्रामीण भागात व्यवसाय, उद्योग नाहीत का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. वीज कपातीच्या माध्यमातून केवळ ग्रामीण भागावरच अन्याय होत असल्याने संतापही व्यक्त केला जात आहे.

Advertisement
Tags :

.