For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लालू यादव यांची ईडीकडून चौकशी

06:11 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
लालू यादव यांची ईडीकडून चौकशी
Advertisement

नोकरीसाठी भूखंड’ प्रकरणात अडचणींमध्ये वाढ

Advertisement

वृत्तसंस्था / पाटणा

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांची प्रवर्तन निदेशालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात आली आहे. ही चौकशी 9 तासांहून अधिक काळ चालली होती. सोमवारी सकाळी साधारणत: 11 वाजता ते आपली खासदार कन्या मिसा भारती यांच्यासह ईडीच्या कार्यालयात पोहचले.

Advertisement

रविवारी बिहारचे मुख्यमंत्री आणि ‘महागठबंधना’चे नेते नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश केला होता. त्यानंतर ते पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. या घटनेला चोवीस तास उलटण्याच्या आत लालू यादवांच्या चौकशीच्या रुपाने बिहारमधील महागठबंधन आणि देशातील विरोधी पक्षांच्या आघाडीला दुसरा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. नोकरीसाठी भूखंड या घोटाळा प्रकरणात लालू यादव प्रमुख संशयित असून त्यांची पत्नी आणि अपत्येही संशयित आहेत.

सहकार्य केल्याचा दावा

आतापर्यंत आपल्या कुटुंबियांनी ईडीला या प्रकरणात साहाय्य केले आहे. जेव्हा आम्हाला बोलाविले जाते तेव्हा आम्ही चौकशीसाठी गेलो आहोत. लालू प्रसाद यादव यांची प्रकृती सध्या बरी नसते. ते स्वत:च्या शक्तीवर चालूही शकत नाहीत. सातत्याने त्यांच्यासमवेत कोणाला तरी असावे लागते. अशा परिस्थितीत त्यांनी ईडीला सहकार्य केले आहे. आता यापुढे काय होणार हे अद्याप आम्हाला माहीत नाही, असे वक्तव्य लालू यादवांच्या कुटुंबियांनी चौकशीनंतर केले आहे.

प्रकरण काय आहे?

लालू प्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबिय यांनी यादव यांच्या सत्ताकाळात सरकारी विभागांमध्ये तरुणांना नोकरी देण्यासाठी त्यांच्याकडून भूखंडांची मागणी केली होती असा आरोप आहे. या तरुणांना त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेतून मिळालेले हे भूखंड यादव कुटुंबिय सांगेल त्याच्या नावावर करावे लागत होते, असा आरोप केला जात होता. चार वर्षांपूर्वी प्रवर्तन निदेशालयाने हे प्रकरण बाहेर काढून त्याची चौकशी चालविली आहे. लालू यादवांच्या पत्नी राबडीदेवीही आरोपी आहेत.

मिसा भारतींची धमकी

लालू प्रसाद यादव वृद्ध असून त्यांची प्रकृती नाजूक आहे. अशा स्थितीत ईडीने त्यांना अटक केली, किंवा त्यांना त्रास दिला तर ते पूर्णत: ईडीचे उत्तरदायित्व असेल. लालू यादव यांच्या नखालाही धक्का लागता कामा नये. तसे झाल्यास सारा बिहार पेटून उठेल असा इशारा त्यांची कन्या मिसा भारती यांनी दिला आहे.

नितीशकुमारांवर टीका

नितीशकुमार हे सरड्याप्रमाणे रंग बदलतात. आता त्यांनी पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीची वाट धरली आहे. त्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे. राष्ट्रीय जनता दलाशी आणि विरोधी पक्षांच्या आघाडीशी नाते तोडून त्यांनी मोठा विश्वासघात केला आहे, अशी टीका मिसा भारती यांनी केली आहे.

आणखी चौकशी होण्याची शक्यता

ईडीने लालू यादव यांची चौकशी सोमवारी रात्री 9 तासांच्या नंतर थांबविली आहे. मात्र, त्यांना चौकशीसाठी पुन्हा बोलाविले जाऊ शकते. अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. मात्र ईडीकडून चौकशीचा पुढचा दिवस स्पष्ट करण्यात आलेला नाही. या घोटाळ्याची व्याप्ती पाहता अनेकदा चौकशी लावावी लागणार आहे, असे दिसून येते. कदाचित लालू यादव यांना या प्रकरणात अटकही होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पुढील चार दिवस महत्वाचे ठरणार आहेत. लालू यादव अरोपी असणारे, हे चारा घोटाळ्यानंतरचे दुसरे मोठे प्रकरण आहे. चारा घोटाळ्याच्या सहा प्रकरणांमध्ये यादव यांना शिक्षा ठोठावण्यात आली होती. काही काळानंतर ते आता कारागृहाबाहेर असून ती टांगती तलवार अद्यापही आहे.

राजकीय परिणाम शक्य

ड लालू यादव यांच्या चौकशीचा विरोधी पक्षांच्या आघाडीला धक्का शक्य

ड लालू यादवांची प्रकृती बिघडल्यास ईडीवरच जबाबदारी : मिसा भारती

ड नोकरीसाठी भूखंड या प्रकरणात लालू यादवांचे कुटुंबियही आहेत आरोपी

Advertisement
Tags :

.