मुख्यमंत्र्यांची दोन तास चौकशी
मुडा प्रकरणी म्हैसूर लोकायुक्त कार्यालयात पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे
प्रतिनिधी/ बेंगळूर
म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाच्या (मुडा) कथित बेकायदा भूखंड वाटप प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या बुधवारी म्हैसूरच्या लोकायुक्त कार्यालयात चौकशीला हजर झाले. लोकायुक्त पोलिसांनी सुमारे दोन तास त्यांची चौकशी केली. अधिकाऱ्यांनी 18 प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांकडून उत्तरे मिळविल्याचे समजते. बुधवारी सकाळी खासगी कारने सिद्धरामय्या बेंगळूरहून म्हैसूरला आहे. ते थेट म्हैसूरच्या लोकायुक्त कार्यालयात चौकशीला हजर झाले. राज्याच्या इतिहासात प्रथमच विद्यमान मुख्यमंत्र्यांना लोकायुक्त चौकशीला हजर व्हावे लागले आहे. चौकशीसाठी हजर झालेल्या सिद्धरामय्यांना लोकायुक्त पोलिसांनी यापूर्वीच तयार केलेले अनेक प्रश्न विचारले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरांनी नोंद करण्यात आली आहे. मुडा प्रकरणात सिद्धरामय्या हे आरोपी क्र. 1 आहेत.
तुमच्या पत्नीला मुडाकडून 14 भूखंड वाटप झाल्याविषयी माहिती आहे का?, तुमच्या प्रभावाचा वापर करून भूखंड मंजूर करवून घेतले का?, तुमच्या पत्नीला भूखंड मिळालेल्या ठिकाणाची तुम्ही पाहणी केली का?, मुडाचा भूखंड गैरव्यवहार उघड होताच तुम्ही पत्नीला भूखंड परत करण्याचा सल्ला दिला होता का?, मुडाने संपादन केलेल्या जमिनीचे पैसे दिल्यास भूखंड परत करेन, असे सांगण्यामागील कारण कोणते?, भूखंड वाटप प्रकरणात तुमची पत्नी आणि मुलाची भूमिका कोणती?, तुमच्या हाती सत्ता असताना भूखंड वाटपासाठी प्रभाव पाडला का?, तुम्ही अधिकाराचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. तुमच्या मेहुण्याने तुमच्या पत्नीला दान स्वरुपात जमीन दिल्याची बाब तुम्हाला माहित होती का?, या प्रकरणासंबंधी तुमच्याजवळ कोणती माहिती आहे?, असे अनेक प्रश्न लोकायुक्त पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत.
यापूर्वी मुख्यमंत्र्यांची पत्नी, मेहुण्याची चौकशी
मुडाच्या गैरव्यवहार प्रकरणी बेंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह त्यांची पत्नी बी. एम. पार्वती, मेहुणे मल्लिकार्जुन स्वामी, जागेचे मालक देवराजू यांच्याविरुद्ध म्हैसूर लोकायुक्त पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. यापूर्वी पार्वती, मल्लिकार्जुन स्वामी आणि देवराजू यांची लोकायुक्त अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. सोमवारी सिद्धरामय्यांना समन्स बजावून 6 नोव्हेंबर रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी ते चौकशीला हजर झाले.
लोकायुक्त एसपींविरुद्ध स्नेहमयी कृष्ण यांची तक्रार
मुडा प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध लोकायुक्त पोलिसांकडून होत असलेल्या तपासावर स्नेहमयी कृष्ण यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सिद्धरामय्यांची म्हैसूर लोकायुक्त पोलिसांकडून चौकशी होताच स्नेहमयी कृष्ण यांनी लोकायुक्त एसपी उदेश यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. उदेश यांनी कर्तव्यात कसूर केली आहे. त्यांना ताकीद द्या, अशी मागणीही स्नेहमयी कृष्ण यांनी लोकायुक्तच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडे केली आहे.
चौकशीवेळी सत्य सांगितले आहे!
मुडा प्रकरणासंबंधी माझ्याविरुद्ध खोटे प्रकरण दाखल करण्यात आले आहे. लोकायुक्त चौकशीवेळी सत्य सांगितले आहे. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली आहे. भाजपला लोकायुक्त संस्थेवर विश्वास काही. सीबीआय चौकशीची त्यांनी मागणी केली आहे. परंतु, सीबीआय केंद्र सरकारच्या हातात आहे. भाजपने आतापर्यंत एक तरी गैरव्यवहाराचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे का?
- सिद्धरामय्या, मुख्यमंत्री