तोडलेली इंटरनेट सेवा पूर्ववत
समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रयत्न
पणजी : वीज खांबावरील कापलेल्या इंटरनेट केबल्सची जोडणी पूर्वरत करण्यात आली असून अनेक ग्राहकांची खंडित झालेली इंटरनेट सेवा आता पुन्हा सुरू झाली आहे. अनेक कंपन्यांची, आस्थापनांची इंटरनेट सेवा बंद पडल्यामुळे त्यांच्या कामावर परिणाम झाला आणि त्यांनी आवाज उठवल्यामुळे केबल कापाकापीची कारवाई वीजखात्याला आणि पर्यायाने राज्य सरकारला स्थगित करावी लागली. यापुढे सरकारतर्फे व वीजखात्यातर्फे केबल कापल्याची कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणात आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्ष घातले आहे.
केबल कापण्याची कारवाई सुरू करणारे अभियंते काशिनाथ शेटये यांनी आपले काम झाल्याचे म्हटले आहे. आता त्या कामासाठी देण्यात आलेले अधिकार आपल्याकडून काढून घेतल्यामुळे पाठपुरावा करण्याबाबत आपणास विचारू नका, असेही त्यांनी सूचित केले. या केबल कारवाई प्रकरणात दोन्ही बाजू लंगड्या असल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केले असून समन्वय साधण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. इंटरनेट केबल्स कापल्यामुळे अनेक उद्योग, कंपन्या, बँक, रेस्टॉरंट, हॉटेल्स, घरांवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे समोर आले. त्यांचे इंटरनेवर चालणारे काम ठप्प झाले. परिणामी कारवाई थांबवण्यात आली असून जोडणी पूर्ववत करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.