वीज खात्याने इंटरनेट केबल्स कापल्याने इंटरनेट ठप्प
खात्याला भाडे न भरल्याचा परिणाम : ग्राहकांनी पैसे भरुनही इंटरनेटवाल्यांमुळे त्रास
पणजी : उच्च न्यायालयाने इंटरनेट सेवा दाराची मागणी फेटाळल्यानंतर वीज खात्याने पणजीतील काही भागांमध्ये वीज खांबांवर बांधण्यात आलेल्या केबल्स कापून टाकल्यानंतर अनेक भागात इंटरनेट सेवा ठप्प झाली. आजही अनेक भागातील केबल कापून टाकल्या जाणार असल्याने पणजीतील खाजगी क्षेत्रातील असलेली इंटरनेट सेवा बंद पडणार असून त्याचा फटका अनेक उद्योगांना व कित्येक सरकारी निम सरकारी कार्यालयांना देखील बसणार आहे.
वीज खात्याने यापूर्वी इंटरनेट सेवा चालविणाऱ्या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना केबल्स बांधल्याप्रकरणी वीज खात्याला भाडे देण्यास सांगितले होते. त्याचे दर निश्चित केलेले असताना केबल चालकांनी टाळाटाळ केली. त्यानंतर वीज खात्याने केबल कापून टाकण्याची धमकी दिल्यानंतर व नोटिसा जारी केल्यानंतर केबलचालकांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 18 मार्च रोजी घेण्याचे ठरविले आहे परंतु तत्पूर्वी वीज खात्याच्या आदेशाला मागितलेली स्थगिती देण्यास नकार दिला. या पार्श्वभूमीवर वीज खात्याने वीज खांबांवर असलेले केबल्स कापून टाकले आणि खांब मोकळे केले. याचा फटका काही बँकांना बसला तर कित्येक उद्योगधंद्यांना व त्यांच्या कार्यालयांना बसला. वीज खात्याने याप्रकरणी कारवाई चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मंगळवारी आझाद मैदान व आसपासच्या परिसरातील केबल्स कापून टाकल्याने अनेक भागातील इंटरनेट सेवा ठप्प झाली आणि अनेकांना त्याचा फटका बसला. उद्योग, व्यवसाय, बँकिंग क्षेत्र तसेच काही सरकारी व निमसरकारी कार्यालयांना देखील त्याचा फटका बसलेला आहे. उद्या आणखीन काही केबल कापल्यानंतर हा फटका आणखीन वाढत जाण्याची शक्यता आहे आणि त्याचा उद्योग धंद्यावर परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे. वीज खात्याने केबल्स कापण्याची आपली मोहीम चालूच ठेवण्याचे ठरविले असल्याने गोव्यातील बऱ्याच भागातील टी. व्ही. वाहिन्या देखील दिसण्याचे बंद होईल अशी चिन्हे दिसत आहेत. कारण वीज खांबांवर इंटरनेट वाहिन्या त्याचबरोबर टी. व्ही. वाहिन्या देखील आहेत. त्या सर्वच कापून टाकल्या जाणार आहेत. पणजीत सुरू झालेली ही मोहीम गोव्यातील इतर भागातही सुरू केली जाणार आहे. केबल चालकांनी जर वीज खात्याला योग्यवेळी भाडे भरले असते तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. मात्र आता केवळ केवळ चालकांनाच नव्हे तर उद्योगधंद्यांना देखील याचा फटका बसणार आहे.
काशिनाथ शेट्योंकडील काढली जबाबदारी
मिळालेल्या माहितीनुसार वीज खात्यातील अभियंता काशिनाथ शेट्यो यांनी केबल्स कापण्याची जी मोहीम सुरु केली आहे, त्याबाबत वीज मुख्य अभियंत्यांनी गंभीर दखल घेऊन त्यांच्याकडून हे अधिकार काढून घेतले आहेत. त्यांच्या जागी दक्षिण गोव्यात बुरये नामक अधिकाऱ्यांची जबाबदारी सोपविली असून उत्तर गोव्यात अन्य अधिकाऱ्याकडे जबाबदारी सोपविली आहे.