लवकरच घरोघरी देणार ‘इंटरनेट कनेक्टिव्हिटी’
पणजी : राज्यात खास करून दुर्गम आणि ग्रामीण भागातील लोकांना मोबाईल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘हर घर नेटवर्क’ योजना लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. योजनेच्या अंमलबजावणीची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. आजच्या युगात शिक्षण, रोजगार आणि सरकारी सेवांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक घराला खात्रीशीर मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे ते पुढे म्हणाले. ग्रामीण आणि दुर्गम भागात संपर्क नेटवर्क मजबूत करण्यासाठी दूरसंचार सेवा प्रदात्यांशी सहकार्य करण्याची सरकारची योजना आहे. डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत राज्याच्या चालू प्रयत्नांवरही मुख्यमंत्र्यांनी प्रकाश टाकला आणि गोव्यात 100 टक्के कनेक्टिव्हिटी कव्हरेज साध्य करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे ते म्हणाले.
गोव्यात लवकरच स्मार्ट वीज मीटर
राज्यात खाजगी आणि व्यावसायिक स्मार्ट वीज मीटर बसविण्याची सरकारची योजना आता प्रत्यक्षात मार्गी लागणार असून पहिल्या टप्प्यात व्यवासयिक आस्थापनांना हे मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी डिजिस्मार्ट नेटवर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पर्वरीत पत्रकारांना ही माहिती दिली. एकूण 7.5 लाख मीटर बदलण्यात येतील. केंद्रीय वीज मंत्रालयाने 467 कोटी ऊपये मंजूर केले आहेत. स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे आता सुरू होणारे काम पुढील सुमारे अडीच वर्षे चालणार आहे.