आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनकार्य कौतुकास्पद
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाने आपल्या परिक्षेत्रातील ग्रामीण भागातील घराघरांत शिक्षणाची गंगा प्रवाहित करण्याचे कार्य केले आहे. त्याचप्रमाणे संशोधनाच्या क्षेत्रातही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविला आहे. शिवाजी विद्यापीठाची ही कामगिरी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी काढले.
शिवाजी विद्यापीठाच्या 62 व्या वर्धापन दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. याप्रसंगी महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांचा विद्यापीठ प्रशासकीय तसेच कल्याण निधी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच, प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘हीरकमहोत्सवी शिवाजी विद्यापीठ‘ या ग्रंथाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथाचे मुख्य संपादक डॉ. भालबा विभूते, डॉ. टी. एस. पाटील, डॉ. इस्माईल पठाण यांचा सत्कार करण्यात आला.
कुलगुरू डॉ. गोसावी म्हणाले, कोल्हापूर ही समाजसुधारक, कलावंत, विचारवंत, कार्यकर्ते, विद्वान यांची भूमी आहे. शैक्षणिक गरजांच्या प्रतिपूर्तीसाठी स्वतंत्र शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हापासून गेल्या 62 वर्षांमध्ये विद्यापीठाने ाा शैक्षणिक व संशोधनात मोलाचे कार्य केले आहे. संशोधनकार्याचा ठसा केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटविला आहे. पश्चिम घाटाच्या संवर्धनासह लीड बॉटेनिकल गार्डनमध्ये देशभरातील दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन करण्याचे काम केले जाते. पर्यावरण, सामाजिक आरोग्य, मानसिक आरोग्य आदी सामाजिक समस्यांवर विद्यापीठांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज निर्माण आहे.
अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली. विद्यापीठाने देशविदेशांतील प्रथितयश संस्थांसमवेत सामंजस्य करार केले आहेत. ऑटोमेशनच्या बाबतीतही विद्यापीठाने आघाडी घेतली आहे. दीक्षान्तसह पीएच.डी., एस.आर.पी.डी. आदी काम कागदविरहित केले आहे. ही सॉफ्टवेअर विद्यापीठाने स्वत: तयार केली आहेत.
प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. धैर्यशील यादव, नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. सरिता ठकार, डॉ. धनंजय सुतार, डॉ. शरद बनसोडे, डॉ. रामचंद्र पवार, डॉ. सागर डेळेकर आदी उपस्थित होते.