सुवर्णसौध आवारात 21 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन
शिस्तबद्ध रितीने साजरा करण्याचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : 20 रोजी शहरात जागृती फेरी
बेळगाव : 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन सुवर्णसौधच्या आवारात दि. 21 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी योग दिनाची सर्वतोपरी तयारी करावी, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने झालेल्या पूर्वतयारी बैठकीत अध्यक्षस्थानावरून होनकेरी बोलत होते. 21 जून रोजी जगभरातून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातही हा कार्यक्रम शिस्तबद्धरीतीने व्हावा, याकडे लक्ष देऊन योग्य रितीने तयारी करण्यात यावी, कार्यक्रमात शिष्टाचाराचे उल्लंघन होणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी केली.
योग दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात व्यापकपणे प्रचार करण्यात यावा, कार्यक्रम स्थळावर आरोग्य खात्यातर्फे तातडीचा चिकित्सा विभाग सुरू करण्यात यावा, खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी, वाहन पार्किंगची व्यवस्था, वीज यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात. इतर खात्यांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कार्यक्रम यशस्वी करावा. योग दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 20 जून रोजी जागृती फेरी होईल. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सकाळी 8.30 वा. जागृती फेरीला सुरुवात करण्यात येईल. फेरीमध्ये शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी व्हावेत, यादृष्टीने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा पंचायतीचे उपसचिव बसवराज हेग्गनायक म्हणाले की, नित्यनेमाने योगासने केल्यास स़ुदृढ समाज निर्मिती शक्य आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात तसेच तत्पूर्वी होणाऱ्या जागृती फेरीमध्ये शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने भाग घ्यावेत यादृष्टीने अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख आर. बी. बसरगी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. श्रीकांत सुनधोळी, कन्नड-सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री, विविध खात्यांचे अधिकारी, विविध शाळा-महाविद्यालयांचे प्रमुख, संघ-संस्थांचे प्रतिनिधी पूर्वतयारी बैठकीला उपस्थित होते.