वारणेत आंतरराष्ट्रीय कुस्तीचा महासंग्राम! भारत विरुद्ध इराण मध्ये मुख्य लढत
शाहूवाडीतील पै. सदाशिव शेळके, पै. महिपती केसरे यांना तात्यासाहेब कोरे कुस्ती भूषण पुरस्कार जाहीर
वारणानगर / प्रतिनिधी
येथील श्री. वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाचे संस्थापक सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या २९ व्या पुण्यस्मरणानिमित्त आज बुधवार दि. १३ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्रामाचे आयोजन केले असून भारत विरुद्ध इराण या पैलवानात मुख्य लढत होणार आहे.
वारणानगर ता. पन्हाळा येथील श्री. वारणा विद्यालयाच्या विशेष तयार करण्यात आलेल्या मैदानावर आंतरराष्ट्रीय विश्वनाथ वारणा शक्ती श्री कुस्तीचा महासंग्रामास दुपारी ठीक १ वा. सुरु होणार आहे. या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी पै सिकंदर शेख विरुद्ध मोनू दहिया,पै हर्षद-सदगीर विरुद्ध अहमद मिर्झा - इराण, पै पृथ्वीराज पाटील विरुद्ध पै लाली - मांड,पै माऊली कोकाटे विरुद्ध पै भीम धूमछडी, पै प्रकाश बनकर विरुद्ध पै अभिनयक सिंग,पै दादा शेळके विरुद्ध पै पालिंदर - मथुरा, पै कार्तिक काटे विरुद्ध पै जितेंद्र त्रिपुडी,पै सुबोध पाटील विरुद्ध पै संदीप कुमार, पै सतपाल सोनटक्के विरुद्ध पै रिजा इराणी,पै कालीचरण - सोलणकर विरुद्ध पै देव नरेला, पै नामदेव केसरे विरुद्ध पै रवी कुमार या “ शक्ती श्री ” किताबाच्या कुस्त्यांसह ३५ पुरस्कृत कुस्त्या त्याचबरोबर वजनी गट ३० किलो ते ८४ किलो पर्यंतच्या २०० हून अधिक चटकदार कुस्त्यांचे आयोजन केले आहे.
मैदानामध्ये आकर्षक लाईट, साऊंड, फ्लोरलाईटसह एक लाख कुस्ती शौकीन बसतील इतक्या आकर्षक रचनेच्या गॅलरीसह बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
जागतिक विक्रम असणारे देशी टारझन पै. संजय सिंग येणार ...
जागतिक ११ विक्रमाची नोंदवलेले देसी टारझन म्हणून जागतिक ख्याती असणारे गोसेवक पै. संजय सिंग यांना या मैदानामध्ये विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शाहूवाडीतील सदाशिव शेळके, महिपती केसरे या नामवंत मल्लांना तात्यासाहेब कोरे कुस्ती भूषण पुरस्कार जाहिर...
शाहूवाडी तालुक्यातील पै. सदाशिव श्रीपती शेळके रा. डोणोली यानी मुंबई येथे मुंबई कामगार केसरी व मुंबई महापौर केसरी स्पर्धेमध्ये ६८ वजन किलो गटात सलग सात वर्षे सुवर्णपदक मिळवले आहे. तसेच १९८० ते २००० अशी वीस वर्षे श्री लक्ष्मीनारायण व्यायामशाळा मुंबई येथे वस्ताद म्हणून सेवा केली आहे. एक उत्कृष्ट कुस्तीपटू म्हणून त्यांचा लौकिक आहे.
पै. महिपती बाबू केसरे वय ८० रा. कापशी यानी उपमहाराष्ट्र केसरी, दोनवेळा राष्ट्रीय सुवर्ण पदक, महाराष्ट्र चॅम्पीयन तसेच पै. सत्पाल, चंबा मुत्नाळ यांच्या बरोबर कुस्ती,पै. काका दह्यारी बरोबर चितपट कुस्ती केली आहे. वारणा समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांच्या २९ व्या पुण्यस्मरणार्थ आयोजीत आंतरष्ट्रीय कुस्ती महासंग्राम मैदानावर पै. सदाशिव शेळके, पै. महिपती केसरे या दोन नामवंत मल्लांना तात्यासाहेब कोरे कुस्ती भूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या कुस्ती मैदानामध्ये राज्यस्तरीय सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे कुस्ती भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.