आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान आज
बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना आयोजित आंतरराष्ट्रीय भव्य कुस्ती मैदान बुधवार दि. 12 रोजी आनंदवाडी आखाड्यात भरविण्यात येणार असून या कुस्ती मैदानाची सर्व तयारी झाली आहे. या मैदानात प्रथमच लॅटीन अमेरिकेचा मल्ल प्रँडीला बेळगावात येत आहे. तसेच इराणचे तीन मल्ल, भारतातील अव्वल पैलवानांशी लढणार आहेत. कर्नाटकाचा वाघ डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे हा सुद्धा पहिल्यांदाच इराणच्या मल्लांशी झुंज देणार आहे. या मैदानात बेळगाव केसरी किताब, बेळगाव मल्ल सम्राट या दोन किताबासाठी लढती होतील. तसेच कुस्तीचा जादुगार देवा थापा या मैदानाचे प्रमुख आकर्षण असून त्याला पाहण्याची उत्सुकता शौकिनांना आहे. यावेळी कुस्ती शौकिनांना आसन व्यवस्था आणि विद्युत रोषणाईची व्यवस्था केली आहे. सर्व निमंत्रित पाहुण्यांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
आखाड्यात पहिल्यांदाच महिलांची कुस्तीचे नियोजन करण्यात आले असून कर्नाटक चॅम्पियन स्वाती पाटील, कडोली व हरियाण चॅम्पियन हिमानी हरियाणा यांच्यात लढत होणार आहे. कुस्ती बेळगाव केसरी किताबासाठी महाराष्ट्र उगवता मल्ल महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड वि. आंतरराष्ट्रीय खेळाडू सोहेल इराण यांच्यात प्रमुख लढत, बेळगाव मल्ल सम्राट किताबासाठी महाराष्ट्रात धुमाकुळ घालणारा रुस्तुमेहिंद व महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व हरियाणा केसरी विशाल हरियाणा यांच्यात, बेळगाव रणवीर किताबासाठी शिवा महाराष्ट्र काका पवारांचा पट्टा वि. आंतरराष्ट्रीय पदक विजेता प्रॅन्डीला-अमेरिका, बेळगाव शौर्य किताबासाठी दादा (वेताळ) शेळके-महाराष्ट्र वि. इराणचा हादी यांच्यात होणार आहे. आकर्षक कुस्ती म्हणून डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे वि आंतरराष्ट्रीय पदक विजेता मिलाद इराण यांच्यात असून यासह इतर कुस्त्याही होणार आहेत.