For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालवण नगरपरिषदेत जागतिक महिला दिन उत्साहात

05:55 PM Mar 08, 2025 IST | अनुजा कुडतरकर
मालवण नगरपरिषदेत जागतिक महिला दिन उत्साहात
Advertisement

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरीषद सभागृह येथे मालवण नगरपरिषदेच्या वतीने आंतरराष्ट्रीय तथा जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला. सांगली येथील दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक संतोष जिरगे उपस्थित होते. श्रीम. जयश्री दुधभाते ( कृषी विभाग अधिकारी), श्रीम. संध्या लोखंडे व श्रीम. सुरेखा खैरनार ( सार्वजनिक बांधकाम विभाग) यांची या कार्यक्रमात मान्यवर म्हणून उपस्थिती होती.

Advertisement

कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले. यानंतर उपस्थित सर्वांचे स्वागत करण्यात आले. नगरपरीषदेच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांनी स्वानुभवातून महिलेची थोरवी सांगितली. एकविसाव्या शतकातील महाराष्ट्रात कुठलीच महिला वंचित राहू नये आणि त्यासाठी लढलं पाहिजे, पुन्हा उभं राहिलं पाहिजे असा मंत्र त्यांनी दिला. कविता हे आपलं अस्तित्व आहे आणि आपल्या विवाहानंतर ते अस्तित्व डोळसपणे खुलवण्यात आपल्या पत्नीचे योगदान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्ञान हा मानवाचा पहिला डोळा असावा व तो सदैव उघडा असावा हे ठामपणे बजावत त्यांना त्यांची पत्नी खंबीर साथ देत आहे असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाईंना वंदन करताना त्यांची कणखरता आत्मसात करण्याची आत्यंतिक आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. कवी नितीन चंदनशिवे यांनी त्यांच्या स्वरचित कवितांच्या सादरीकरणातून उपस्थितांना महिला दिनाच्या उद्देशांची महती समजावली व शुभेच्छा दिल्या.यावेळी मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी सांगितले की हा जागतिक महिला दिन समस्त मानवजातीची चळवळ आहे. महिलांचे सक्षमीकरण ही महत्वाची बाब असून सर्वांनीच त्यासाठी जबाबदारीपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी सांगितले व महिलांना शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Advertisement
Tags :

.