भारतामध्ये आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धा
वृत्तसंस्था / चंदीगड
येत्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळणार आहे, असे अखिल भारतीय अॅथलेटिक फेडरेशनने सांगितले आहे.
2029 च्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी भारताचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सध्या क्रीडा क्षेत्रातील विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारतामध्ये यशस्वीपणे भरविल्या जात आहेत. 2029 विश्व अॅथलेटिक चॅम्पियनशीपच्या यजमानपदासाठी भारत इच्छुक असल्याचे अखिल भारतीय अॅथलेटिक फेडरेशनचे मावळते अध्यक्ष अदिल सुमारीवाला यांनी सांगितले. तसेच 2027 च्या विश्व रिले स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारत इच्छुक असल्याचेही ते म्हणाले.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक फेडरेशनचे प्रमुख सेबेस्टियन को यांनी भारताला भेट दिली होती. भारतात आगामी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत जगातील अव्वल पहिले 10 भालाफेक धारक सहभागी होणार आहेत. ऑलम्पिक सुवर्ण आणि रौप्य पदक विजेता नीरज चोप्रा हा या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण राहिल. या वर्षाच्या अखेरीस निमंत्रितांची स्पर्धा भारतात भरविली जाणार आहे. अखिल भारतीय अॅथलेटिक फेडरेशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील पहिल्या दिवशी सुमारीवाला यांनी ही माहिती दिली. 7 ऑगस्ट 2021 रोजी टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात भारताच्या नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळविले होते. आता 7 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरा केला जातो. 2002 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत गोळाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळविणारे भारताचे अॅथलिट बहाद्दुरसिंग सागो यांची अखिल भारतीय अॅथलिटक फेडरेशनच्या प्रमुखपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
2004 साली भारताने नवी दिल्लीत झालेल्या विश्व हाफ मॅरेथॉन चॅम्पियनशीप स्पर्धेचे यजमानपद भूषविले होते. 2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपद शर्यतीमध्ये भारताचा समावेश आहे.