For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय क्रेडिट

05:31 PM Mar 12, 2025 IST | Pooja Marathe
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना  आंतरराष्ट्रीय क्रेडिट
Advertisement

शिवाजी विद्यापीठाचा स्वीडन विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार

Advertisement

कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठासमवेत मिड स्वीडन विद्यापीठाचा झालेला करार विद्यार्थी-शिक्षक आदानप्रदानाच्या पलिकडे सांस्कृतिक देवाणघेवाणीचा म्हणून अधिक महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन युरोपमधील मिडस्वीडन विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक मॅग्नस हमलगार्ड यांनी केले.

Advertisement

शिवाजी विद्यापीठाचा स्वीडनमधील मिड स्वीडन विद्यापीठासमवेत गेल्या नोव्हेंबरमध्ये शैक्षणिक व संशोधकीय साहचर्याच्या अनुषंगाने सामंजस्य करार झाला आहे. त्या कराराच्या पुढच्या टप्प्यातील अधिक सविस्तर असे करारपत्र या दोन्ही विद्यापीठांदरम्यान करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

प्रा. हमलगार्ड म्हणाले, गेल्या दोन दिवसांत शिवाजी विद्यापीठातील अनेक अधिविभागांना भेटी देऊन तेथील प्रयोगशाळा, उपलब्ध संशोधन सामग्री, उपकरणे यांची पाहणी केली. या दोन्ही विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या विविध संशोधनामध्ये, उपलब्ध सुविधांमध्ये साम्य आढळून आले. त्यामुळे आणखी प्रगतीशील संशोधनाच्या दिशा धुंडाळता येऊ शकतील.

प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील म्हणाले, या कराराद्वारे शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी अध्ययनासाठी मिड स्वीडन विद्यापीठामध्ये जाऊ शकणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क (ट्यूशन फी) माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी आणि सध्या मिड स्वीडन विद्यापीठात संशोधक, प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. मनिषा फडतरे यांच्या अखंडित प्रयत्नांमुळे सदरचे करार साकार झाले आहेत, याचा मनस्वी अभिमान वाटतो. डॉ. सागर डेळेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एस.बी. सादळे यांनी आभार मानले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.