आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नेतन्याहूंविरोधात वॉरंट
वृत्तसंस्था/हेग
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने गुऊवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह माजी संरक्षण मंत्री योव गॅलेंट आणि हमासच्या अधिकाऱ्यांविरोधात अटक वॉरंट जारी केले. त्यांच्यावर गाझामधील युद्ध आणि ऑक्टोबर 2023 च्या हल्ल्यांवरील युद्ध आणि मानवतेविऊद्धच्या गुन्ह्यांचा ठपका ठेवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या पवित्र्यामुळे नेतन्याहू आणि इतरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वॉन्टेड संशयित बनवण्यात आले आहे. तसेच गेल्या 13 महिन्यांपासूनचा इस्रायल-हमास संघर्ष संपवण्यासाठी युद्धविराम वाटाघाटी करण्याच्या प्रयत्नांचा दबाव म्हणूनही या निर्णयाकडे पाहिले जात आहे.
मात्र, नेतन्याहू आणि इतर इस्रायली नेत्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्य अभियोक्ता करीम खान यांनी वॉरंटसाठी केलेल्या शिफारसीला ‘लज्जास्पद’ असे संबोधले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या पॅनेलने नेतन्याहू आणि त्यांचे माजी संरक्षण मंत्री योव गॅलेंट यांच्यासाठी वॉरंट जारी करण्याचा निर्णय एकमताने घेतला. न्यायालयाने हमासच्या म्होरक्मयांपैकी एक असलेल्या मोहम्मद देईफच्या अटकेचे वॉरंटही जारी केले. न्यायालयाच्या मुख्य अभियोक्त्याने याह्या सिनवार आणि इस्माईल हनियाह या दोन अन्य वरिष्ठ हमास व्यक्तींसाठी वॉरंट मागितले होते, परंतु ते दोघेही यापूर्वीच संघर्षात मारले गेले आहेत.